नावीन्याची कास धरणारी मसाप!

    06-Jul-2022   
Total Views |
मसाप
 
 
 
 
 
 
मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या माध्यमातून नवीन साहित्यिक निर्माण व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र साहित्य परिषदेची डोंबिवली शाखा जोमाने कार्यरत आहे. या शाखेच्या कार्याचा आढावा घेणारा हा सविस्तर लेख...
 
 
महाराष्ट्र साहित्य परिषद’ या आद्य साहित्य संस्थेची स्थापना 27 मे, 1906 रोजी पुणे येथील मळेकर वाड्यात झाली. संस्थेच्या स्थापनेमागचा इतिहास जाणून घेण्यासारखा आहे. 1878 साली पुण्यात हिराबागेत साहित्यिकांचे पहिले संमेलन लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या पुढाकाराने भरले होते. या संमेलनाला ‘ग्रंथकरांचे संमेलन’ असे नामानिधान होते. अर्थात अलीकडील साहित्य संमेलनाला जसे कोणत्या ना कोणत्या कारणाने विरोध होत असतो, तसाच विरोध त्याही संमेलनाला झाला होता. त्या विरोधाचे अग्रणी होते, ज्योतिराव फुले! या संमेलनात ‘माझा शेतकरी कुठे आहे?’ असा खडा सवाल त्यांनी विचारला होता. त्यानंतरचे दुसरे ग्रंथकार संमेलन पुण्यातील सार्वजनिक सभेच्या सभागृहात 1885 मध्ये, कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले, तर तिसरे ‘ग्रंथकर संमेलन’ 1905 मध्ये, सातारा येथे कृष्णाजी पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. चौथे संमेलन मात्र लगेच पुढच्या वर्षी म्हणजे 26, 27 मे, 1906 या काळात, पुणे येथे नागनाथ पाराजवळील मळेकर वाड्यात, वासुदेव गोविंद कानेटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याचाच अर्थ असा होता की, ही ‘ग्रंथकार संमेलने’ भरविण्यात सातत्य नव्हते. या संमेलनास साहित्यिक न. चिं. केळकर, लोकमान्य टिळक, इतिहासकार चिंतामणराव वैद्य, रेव्हरंड टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
संमेलनाला काही एक स्थायी रूप द्यायला हवे, या विचारातून, २७ मे १९०६  रोजी म्हणजे याच संमेलनात ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेची’ स्थापना झाली, अशी घोषणा न. चिं. केळकर, रानडे यांच्या प्रेरणेने करण्यात आली आणि लोकमान्य टिळक यांनी उठून या सूचनेला पाठिंबा दिला. मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य याचे जतन करणे, संवर्धन करणे अशी उद्दिष्टे या स्थापनेमागे होती आणि संपूर्ण महाराष्ट्र हे परिषदेचे कार्यक्षेत्र राहील, असेही ठरविण्यात आले आणि त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी 82 शाखा अत्यंत उत्साहात कार्यरत आहेत. या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेचे कार्यालय आधी पुणे, त्यानंतर काही काळ मुंबईत होते, पण नंतर कार्यालय पुण्यातच आले.
 
 
महाराष्ट्र साहित्य परिषदेची आज पुण्यात टिळक रस्त्यावर जी इमारत उभी आहे, ती जागा (जमीन) औंधचे संस्थानिक पंतप्रतिनिधी यांनी दिली आहे. ही जागा मिळाल्यावर इमारत उभी राहिली तेव्हा 1937 साल उजाडले होते. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ची स्थापना झाल्यावर एक मोठा फरक पडला, तो म्हणजे विलंबाने किंवा काहीशा खंडित स्वरूप आयोजित केली जाणारी साहित्य संमेलने नियमितपणे आयोजित केली जाऊ लागली. क्वचित काही वेळेस वर्ष दोन वर्षांचा खंड पडला, नाही असे नाही. 1961 साली महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. त्यांच्या पुढाकाराने ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’ची स्थापना झाली. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद आणि मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई या चार प्रमुख साहित्य संस्था, साहित्य महामंडळाच्या घटक संस्था होत्या.
 
 
या मंडळाच्या स्थापनेमागचा प्रमुख उद्देश होता तो म्हणजे, मराठी भाषेसंबंधी तत्कालीन प्रश्न तसेच पुढील काळात उद्भवणार्‍या भाषिक समस्या सोडविण्यासाठी एकच मोठे व्यासपीठ संस्था असावी. शासनाकडे प्रश्नांचा पाठपुरावा करणे, तसेच आपल्या उद्देशाला समाजातून व्यापक पाठिंबा मिळविणे, हाही उद्देश होता. तसेच साहित्य महामंडळाने साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारीही स्वीकारावी, अशीही तरतूद घटनेत करण्यात आली होती. साहित्य महामंडळाच्या स्थापनेत अनंतराव भालेराव, वा. रा. ढवळे, ग त्र्यं. माडखोलकर आदी मान्यवरांचे सहकारी लाभले होते.
 
 
 
संमेलन आयोजित करण्याची जबाबदारी स्वीकारल्यावर 1965 पासूनची संमेलने महामंडळाच्या नावावर नोंदण्यात आली. 1964 संमेलन जे गोवा येथे कवी कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले होते, ते ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’तर्फे आयोजित करण्यात आलेले अखेरचे 45 वे संमेलन होते. त्यानंतर 1965 साली हैदराबाद येथे प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले ते साहित्य महामंडळाचे पहिले संमेलन होते. असे असले तरी, महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरविलेली आपली 45 संमेलने, महामंडळाच्या नावावर दाखविण्यात यावी, असे सांगितल्याने महामंडळाचे हैदराबाद येथील पहिले संमेलन हे क्रमाने 46वे ठरले. आपली संमेलने, महामंडळाला देण्यात मसापचा मोठेपणा वाखाणायला हवा. या साहित्य संमेलनाच्या आयोजनाशिवाय मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संदर्भात काम करायचे, याचाच अर्थ वाङ्मयीन कार्याचे आयोजन करणे आवश्यक होते.
 
 
सुदैवाने महाराष्ट्र साहित्य परिषदेतच कविवर्य माधवराव पटवर्धन सभागृह असल्यामुळे तेथे विविध साहित्यिक कार्यक्रम, प्रकाशन समारंभ, मान्यवरांची व्याख्याने,वाङ्मयीन परिसंवाद असे अनेक कार्यक्रम नित्य आयोजित करण्यात येऊन, त्यायोगे नवीन कलाकार आणि लेखक यांनाही व्यासपीठ उपलब्ध झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अन्य ८२ शाखाही अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्रातील विविध शहरात आयोजित करीत असतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वास्तूत मागील 84 वर्षे कार्यरत असलेले वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयही जुने संदर्भ ग्रंथ, जुनी नियतकालिके, दुर्मीळ ग्रंथांचे जतन करून वाङमयीन अभ्यासकांना उत्तम सेवा देत आहे.
 
 
यासोबतच महाराष्ट्र साहित्य परिषद अनेक जुन्या दुर्मीळ ग्रंथांचे जतन, प्रकाशन तसेच मराठी वाङ्मयाचा इतिहाससारखे खंड प्रकाशित करीत असते. तसेच दर वर्षी साधारणपणे ५० प्रकारच्या वाङ्मय प्रकारातील ग्रंथांना आणि लेखकांना पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार मिळविण्यासाठी लेखकांना किंवा प्रकाशकांना अर्ज करावे लागत नाहीत. आणि म्हणूनच महाराष्ट्र साहित्य परिषद हा पुरस्कार मिळणे हे साहित्यिकांना अभिमानाचे वाटते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आणखीन एक महत्त्वाचे कार्य म्हणजे, आर्थिकदृष्ट्या विकल असलेल्या साहित्यिकांना आर्थिक साहाय्य दिले जाते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जरी साहित्य महामंडळाकडून आयोजित केले जात असले तरी, या आयोजनात साहित्य परिषदेचा महत्त्वाचा सहभाग असतो आणि या संमेलनातून प्रथितयश तसेच नवोदितांना संधी देण्याचा प्रयत्न असतो.
 
 
 
परंतु, एका संमेलनात सर्वांनाच संधी मिळत नाही म्हणून मग साहित्य परिषदेने ‘विभागीय साहित्य संमेलन’ घेण्याची सुरुवात केली आणि आज महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी ही विभागीय साहित्य संमेलने, साहित्य परिषदेच्या तिथल्या स्थानिक शाखांच्या माध्यमातून आयोजित केली जातात. या संमेलनातून अनेक होतकरू साहित्यिकांना संधी मिळू शकते. महाराष्ट्र साहित्य परिषद केवळ ‘विभागीय साहित्य संमेलन आयोजित करते असे नव्हे तर, ‘समीक्षा संमेलन’ ‘युवा नाट्य संमेलन’ आणि साहित्य परिषदेच्या सर्व शाखांचा मेळावाही आयोजित करत असते. या सर्व कार्यक्रमाव्यतीरिक्त अन्य काही आयोजने आहेत. वानगीदाखल उल्लेख करायचा झाला तर मान्यवर साहित्यिकांशी, कलाकारांशी मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम, कथालेखकांकडून कथेच्या निर्मिती प्रक्रियेविषयी आणि कवींकडून कवितेच्या अभिव्यक्तीविषयी ऐकणे हा कार्यक्रम. लेखक- कवींसाठी लेखन कार्यशाळेचे आयोजन केले जाते. केवळ साहित्य आणि समीक्षा याच विषयाला वाहिलेले ‘साहित्यपत्रिका’ हे त्रैमासिक 1912 पासून प्रकाशित होत असून आपला दर्जा टिकवून आहे. मराठी भाषाविषयक अभ्यासक्रम आखून त्यांची परीक्षा साहित्य परिषदेतर्फे घेतली जाते. अशा प्रकारे विविध उपक्रम आणि कार्यक्रम यांच्याद्वारे मराठी भाषेची जपणूक करण्याचा प्रयत्न केला जातो.
 
 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष दिल्लीत जाऊन आंदोलन केले आहे तर पुणे, डोंबिवली, मुंबईसारख्या शहरात स्वतंत्रपणे आणि अन्य साहित्य संस्थांबरोबर आंदोलने केली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 82 शाखांमार्फत कार्य सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र साहित्य परिषद रुजवण्याचे काम शिक्षक आमदार प्रभाकर संत यांनी केले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नातून जिल्ह्यात १५  शाखा स्थापन केले आहेत. एवढ्यावरच त्यांचे काम थांबलेले नसून नवीन शाखा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ या शाखा चांगल्यापैकी कार्यरत आहेत. ‘मसाप’ची डोंबिवली शाखा साधारणपणे १९८८ च्या सुमारास स्थापन झाली. शाखेच्या उभारणीत जसा संत यांचा महत्त्वाचा सहभाग होता, त्याचप्रमाणे त्यांना मधुकर देशपांडे, दत्ताय रानडे, अरुण खाडिलकर, भाऊ वैद्य, पु. स. ओक, दिलीप महाजन, स्मिता तळेकर, सुरेश देशपांडे यांचीदेखील चांगली साथ लाभली. या कार्यकर्त्यांच्या जोरावर ‘मसाप’ डोंबिवली शाखेने 1993 मध्ये विभागीय साहित्य संमेलन आयोजित केले होते. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांचे कार्यक्रम संस्थेने आयोजित करून डोंबिवलीकर साहित्यप्रेमींना भाषण ऐकवण्याची संधी उपलब्ध करून दिली.
 
 
 
 
2016नंतर ‘मसाप’ डोंबिवली शाखेने सातत्याने उत्कृष्ट कार्यक्रम तर दिलेच, पण वाचणार्‍यांना लिहिते करावे. विविध वयोगटातील लोकांसाठी निबंध स्पर्धा, ललित कथा स्पर्धा, लेखस्पर्धा तसेच मला आवडलेले मराठी पुस्तक या विषयावर लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी दिली. मसापच्या या प्रयत्नांना केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर परदेशातून ही प्रतिसाद मिळाला. 9 फेब्रुवारी, 2020 रोजी मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या सहकार्याने ४५ मुंबई महानगर साहित्य संमेलन डॉ. राजेंद्र गवस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले तर सहा मार्च २०२२ रोजी समीक्षा संमेलन ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले. या संमेलनाचे महाराष्ट्रातून कौतुक करण्यात आले. करुणा काळात फेसबुकच्या माध्यमातून 19 कार्यक्रम सादर केले. डोंबिवलीतील ज्येष्ठ कलाकारांना सहभागी करून स्मरण रंजन हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सादर केला. या सर्वांची दखल घेऊन मसाप डोंबिवली शाखेला 2020 चा ‘उत्कृष्ट शाखा पुरस्कार’ मिळाला.
 
 
 
तसेच शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांना ’रत्नाकर कुलकर्णी मसाप कार्यकर्ता पुरस्कार’ मिळाला. येत्या डिसेंबरमध्ये ‘युवा नाट्य संमेलन’ घेण्याचा डोंबिवली शाखेचा मानस आहे. अध्यक्ष वामनराव देशपांडे, सुरेश देशपांडे, आनंद गोसावी, उमा आवटे पुजारी, दीपाली काळे व अन्य कार्यकर्ते तळमळीने काम करत आहेत. ‘मसाप’च्या मुख्य शाखेत श्रीनिवास बनहट्टी, ना. ग. गोरे, गं. बा. सरदार, वसंत कानेटकर यांच्यापासून ते प्रा. द. मा. मिरासदार यांच्यापर्यंत अनेक साहित्यिकांनी ‘मसाप’चे अध्यक्षस्थान भूषविले आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘मसाप’चा आणि पुणे शहराचा चालताबोलता इतिहास म्हणून ओळखले जाणारे आणि ज्यांच्या नावाची पायरी साहित्य परिषदेच्या इमारतीला लावली आहे ते म. श्री. दीक्षित यांनी साहित्य परिषदेत सर्व पदांवर काम केले आहे.
 
 
 
 मसाप 1
 
 
 
 
 
आता 100 वर्षांनंतरच्या काळात साहित्य परिषददेखील बदलली आहे, असे वाटते. तिने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा केल्या आहेत. ऑनलाईन कार्यक्रम असतील किंवा परिषदेच्या इमारतीत लिफ्टसह केले जाणारे बदल, दुर्मीळ आणि संदर्भ पुस्तकांचे संगणकीकरण, पटवर्धन सभागृहाचे नूतनीकरण असे अनेक प्रकल्प आहेत. भौतिक आणि बौद्धिक गती-प्रगतीत सामील होत आहे. बदलत्या सामाजिक, आर्थिक परिप्रेक्षात साहित्यानेदेखील नावीन्याची कास धरायला हवी. बदलत्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब साहित्यात पडायला हवे. आज जग एवढ्या वेगाने बदलत आहे की, तो वेग स्तिमित करणारा आहे. मानवी जीवनाचे ताणेबाणे आणि व्यामिश्रता यामुळे मानवी मूल्ये हरवतील की काय, अशी भीती वाटावयास लागली आहे. संपर्क साधने वाढली असूनसुद्धा किंवा असल्यामुळेच माणूस एकटा पडत चालला आहे की काय, अशी साधार भीती वाटते आहे. माणसे शरीराने जवळ असूनही मनाने दूर जात चालली आहेत.
 
 
 
भोवळ आणणारी ही परिस्थिती साहित्य चांगल्याप्रकारे हाताळू शकेल. एखादी चांगली साहित्य कृती वास्तवाचे भान देऊन त्यातून कसा मार्ग काढायचा हे सांगू शकेल. यासाठी साहित्याने आपली चौकट ओलांडून बाहेर पडावयास हवे. मराठी भाषेतील साहित्याशिवाय अन्य भाषेतील साहित्याकडे जायला हवे. फक्त अन्य भाषाच नव्हे, तर मराठीच्या बोलीभाषादेखील लोकसाहित्याने समृद्ध आहेत. त्यातील लोककथा, लोकसंगीत यांचा वेध घेऊन ते साहित्य जे आज खेडोपाडी विखुरलेल्या अवस्थेत आहे, त्याचे परिशीलन करून जर प्रकाशात आणले तर आपल्या जीवनातील अनेक समस्या सहजपणे सोडविता येऊ शकतील, एवढे सामर्थ्य लोकसाहित्यात आहे. जगभरातील लोकसाहित्यानेच मानवाला जगण्याचे मूल्यभान दिले आहे, हे आपण विसरलो आहोत आणि म्हणूनच आजची गोंधळाची, भीतीची, अस्वस्थतेची अवस्था निर्माण झाली आहे, अशी खंत संस्थेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
मराठी साहित्यातदेखील प्रमाणभाषा आणि तिच्या बोलीभाषा यांचा संगम दिसायला हवा. साहित्यातील विविध प्रवाह एकत्र येऊन एक मोठाच प्रवाह निर्माण व्हायला हवा. तसेच मराठी साहित्य अधिकाधिक समृद्ध व्हायला हवे असेल, तर अन्य भाषेतील साहित्याचे अनुवाद आपल्याकडे यायला हवेत आणि आपले साहित्य दुसर्‍या भाषेत जायला हवे. अशा प्रकारे साहित्याचे आदानप्रदान. मानवी जीवनाच्या आकाशात नवरंग भरायचे असतील, तर साहित्याचा फार मोठ सहभाग असायला हवा. केवळ भाषिक अस्मिता गोंजारून साहित्य परिपूर्ण होणार नाही. भाषिक अस्मिता हवीच, पण अट्टहास नको, दुराग्रह नको. अशामुळे उलट समाजातील दरी वाढेल आणि साहित्याचे काम तर मानवी जीवांना एकत्र आणणे आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद अशाच प्रकारे कार्य मागील ११६ वर्ष करीत आली आहे. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या वर्धापनदिनी नेहमीच अन्य भाषेतील मोठ्या साहित्यिकास आवर्जून बोलावले जाते. जुने न सोडता नावीन्याची कास धरणारी ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ या संस्थेचे कार्य वर्धिष्णू आहे.
 
 
 
 -जान्हवी मोर्ये 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.