लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर

    06-Jul-2022
Total Views |
लक
 
 
 
 
 
 
 
वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर या राष्ट्र सेविका समितीच्या आद्य प्रमुख संचालिका. वं. मावशींचा जीवनपट थोडक्यात मांडायचा म्हणजे एका अखिल भारतीय महिला संघटनेचा इतिहास मोजक्या शब्दांत मांडणे होय. आज त्यांच्या जयंतीनिमित्त केलेले हे स्मरण...
 
 
‘प्रणाम घे, हा कोटीकरांचा
कृतज्ञतेने करितो वंदन
राष्ट्रोन्नतीचा मार्ग दाविला
फिटेल कधी का हे तव ऋण’
 
 
दि. ६ जुलै, १९०५, आषाढ शु. दशमी भास्करराव व यशोदाबाई दाते यांच्या कुटुंबात एका कन्येचा जन्म झाला. आवरणात्मक पिशवीसकट सुलक्षणे जन्मलेल्या या कन्येचे नामकरण ‘कमल’ असे करण्यात आले. बालपणापासूनच अनेक संकटांना तोंड देत कमल मोठी होत होती. दाते कुटुंब मूळचे सातारचे, अतिशय सोज्वळ, संवेदनशील. आपल्या पित्याकडून सामाजिक कार्याचा, तर आईकडून राष्ट्रप्रेमाचा वारसा मिळालेल्या कमलला इंग्रजी शाळेत गायले जाणारे येशूचे गोडवे, हिंदू देवदेवतांची निंदा सहन झाली नाही आणि कमलने इंग्रजी शाळेत शिक्षण घेण्यास नकार दिला.
 
 
 
पदरी शालेय शिक्षण केवळ चौथी, बोलायची, वक्तृत्वाची सवय नाही, पण प्रबळ इच्छा, दृढनिश्चय व अविरत परिश्रम हे भांडवल सोबत असेल, तर कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आपोआप निर्माण होते आणि याच शक्तीतून ध्येयवेड्या व्यक्तीकडूनच इतिहास घडविला जातो, हेही तितकेच खरे. कमलबाबत ही तसेच झाले. वयाच्या 14व्या वर्षी विवाह होऊन कमल, लक्ष्मीबाई पुरुषोत्तमराव केळकर झाली. वर्धा येथे वकील असलेल्या पुरुषोत्तमरावांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. आईविना पोरक्या झालेल्या दोन अपत्यांना आईची उणीव त्यांनी कधीही जाणवू दिली नाही. गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या आपल्या पतीची सेवा करत न डगमगता, आलेल्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जात लक्ष्मीबाई लढत होत्या. अखेर काळाने घाला घातलाच लग्नानंतर अवघ्या 10-12 वर्षांतच त्यांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आलं. पती निधनानंतर केळकर कुटुंबाची जबाबदारी मावशींवर येऊन पडली. घराची धुरा सांभाळताना ’शेतीभातीचे काम एक विधवा काय सांभाळणार’ असे म्हणणार्‍यांना अतिशय संयत पद्धतीने आपले घर, शेती सांभाळत त्यांनी न बोलता उत्तर दिलं.
 
 
 
मुलांवर चांगले संस्कार केले. त्या काळात विधवांना कोणत्याही मंगलकार्यांत आमंत्रित केले जात नव्हते, अशा वेळी त्या विधवांनाही जगण्याचा हक्क आहे, हे समाजासमोर ठासून सांगायच्या आणि तसे वागायच्याही. त्यांचातील हीच संवेदनशीलता महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना सदैव प्रयत्नशील ठेवत होती. रामायण प्रवचनातून त्यांनी जागृतीचा मार्ग अवलंबिला. इ.स. 1930-36 काळात जेव्हा स्पृश्य-अस्पृश्य भाव अधिक होता, त्या काळातही अस्वच्छ सवर्णापेक्षा स्वच्छ हरिजन केव्हाही घरातल्या किंवा शेतीतल्या कामात कामास ठेवावा, हा समरसता संस्कार आपल्या वर्तनातून वंदनीय मावशी पाळत होत्या.
 
 
 
त्याच काळात पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. देशभर राष्ट्रप्रेम भाव जागृत होऊन एक नवी चेतना निर्माण झाली. मावशींचे सुपुत्र संघाच्या शाखेत जायचे. मुलांची संघशिक्षा पाहून त्यांना महिलांसाठीही असे संघटन असावे, असे वाटले. स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, स्त्री आणि पुरुष हे राष्ट्ररुपी गरुड पक्ष्याचे दोन पंख आहेत. त्यातील कोणताही एक पंख कमकुवत असून चालणार नाही. एका कार्यक्रमात महात्मा गांधींही म्हटले होते, सीतेच्या निर्माणातूनच राम निर्माण होईल. घर, संस्कृती, संस्कार याचा भक्कम आधार स्त्रीच आहे. त्यासाठी तिने संघटित असायलाच हवे, हे विचार मावशींना स्वस्थ बसू देत नव्हते.
 
 
 
मनात आलेला विचार त्यांनी प्रत्यक्ष पू. डॉ. हेडगेवार यांना बोलून दाखवला. डॉ. हेडगेवार व वं. मावशी यांच्या भेटीतून स्त्रीचा विचार करायचा असेल, तर स्वतः स्त्रियांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न हाताळावयास हवा, असा विचार पुढे आला आणि दि. 25 ऑक्टोबर, 1936 रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वर्धा येथे राष्ट्र सेविका समिती या अखिल भारतीय महिला संघटनेचे बीजारोपण झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्र सेविका समिती या दोहोत वैचारिक आणि कार्यक्रमात्मक साम्यता असली, यथायोग्य सहकार्य असले तरी समिती संघाची स्त्री शाखा म्हणून कधीच गणली जाणार नाही, हे स्पष्ट करत पू. डॉ. हेडगेवार यांनी आगगाडीच्या रुळाचे उदाहरण दिले.
 
 
ते म्हणाले, ”आगगाडीच्या रुळांप्रमाणे या दोन्ही संघटना समांतर असतील, पण कधी एकत्र येणार नाही.” याप्रमाणेच आजही या दोन्ही संघटना एका विचाराने, परस्पर सहयोगाने परंतु स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. ’राष्ट्र सेविका समिती’च्या स्थापनेनंतर पायाला भिंगरी लावून वं. मावशींनी वैयक्तिक संपर्कातून, आपल्या स्नेह-वात्सल्यातून समिती कार्य वाढविण्यास सुरुवात केली. आपल्याप्रमाणे पुण्यातही सरस्वतीताई आपटे महिलांसाठी काम करीत आहेत, हे कळताच वं. मावशी त्यांना प्रत्यक्ष भेटल्या. आपल्या कामाची त्यांना माहिती दिली. वं. ताई आपटे यांनी पुण्यात सुरू केलेले आपले काम नि:स्वार्थपणे राष्ट्र सेविका समितीत विलीन केले आणि समितीचे जाळे देशभर विणले जाऊ लागले.
 
 
 
आज समितीचे कार्य विश्वव्यापी आहे. आपले राष्ट्र, आपल्या राष्ट्राचा गौरव, राष्ट्रप्रेम जागृत करण्याचा भाव हे स्त्रीवरच अवलंबून आहे. राष्ट्रधर्माची ती रक्षक, वाहक आहे, राष्ट्राची जननी आहे. प्रेम आणि संस्कार यातून समाज घडविणे, हे तिचे आद्य कर्तव्य आहे. ती विशेष कर्तव्यदक्ष आणि कार्यकुशल असायलाच हवी. आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी तिला यांचं भान असायला हवं. स्त्री हीच राष्ट्राची आधारशक्ती आहे, या आधारसूत्राने, तेजस्वी हिंदुराष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे स्वप्न मनाशी बाळगून अखिल भारतीय महिलांचे शिस्तबद्ध संघटन वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर यांनी उभे केले.
 
 
 
 
सद्गुणांची शेती केवळ भाषणबाजीने होणार नाही, हे त्या चांगलेच जाणत होत्या. सद्गुणाचे नित्य सिंचन हे आपल्या स्वभावातूनच, वागण्या-बोलण्यातून, आचरणातून करावे लागते, हा आदर्श जीवनाचा मूलमंत्र त्यांनी आपल्या स्वभावातून, आपल्या आचरणातून अनेक सेविकांना दिला. ऐतिहासिक दाखल्यातून जिजामाता, अहिल्याबाई, झाशीची राणी यांचे अनुक्रमे मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्वरुपी आदर्श संघटनेला डोळ्यासमोर ठेवायला लावणार्‍या मावशी स्वत: मातृत्व-कर्तृत्व-नेतृत्व यांचा विशाल संगम होत्या. नि:स्वार्थ प्रेम, स्नेह, वात्सल्य, यासह झालेल्या संपर्कामुळे व ध्येयासाठी अविरत घेतलेल्या परिश्रमामुळेच वर्ध्यासारख्या छोट्या गावातील लक्ष्मीबाई केळकर या सार्‍या विश्वाच्या वंदनीय मावशी केळकर झाल्या.
 
 
 
आपली तत्त्व, शिस्त याबाबत अतिशय कठोर असलेल्या वं. मावशी सेविकांच्या बाबतीत मात्र अतिशय हळव्या होत्या. आपल्या अखंड मातृभूमीचे विभाजन होऊन भारत व पाकिस्तान अशी दोन वेगवेगळी राष्ट्रं निर्माण होणार, हे कळल्यावर सिंध येथील समितीची सेविका जेठी देवानीने पत्र लिहून आपल्या माऊलीला, प्रमुख संचालिकेला साद घातली. विभाजनापूर्वी मावशी एकदा भेटून जा आणि या आपल्या सेविकेच्या हाकेला साद देत फाळणीच्या अतिशय भीषण परिस्थितीत, सर्वत्र भयावह वातावरण असूनही धैर्यपूर्ण निर्णय घेत, वेणूताई कळमकर यांना सोबत घेऊन, या संकटप्रसंगी खचून न जाता धैर्याने संकटांना सामोरे जा, असे मनोबल उंचावण्यासाठी ही माऊली कराचीला निघाली.
\
 
 
कराची व सिंध भागात हिंदूंवर मुसलमान समाजाकडून अतोनात अत्याचार केले जात होते. खून, हाणामारी, जाळपोळ, लुटालूट, बलात्कार, मुली पळवून नेणे अशा अनेक घटना घडत होत्या. फाळणीपूर्वी एकत्र सलोख्याने राहणारे शेजारी मुसलमानांनी विश्वासघात करत हजारो हिंदूंची कत्तल केली. अशा परिस्थितीत 14 ऑगस्ट, 1947 रोजी कराची येथे एका घराच्या छतावर 1200 सेविकांनी भगव्या ध्वजासमोर रक्ताचा टिळा लावून आपल्या प्रमुख संचालिकेसमोर प्रतिज्ञा घेतली. ‘धैर्यशाली बनो, अपने शील का रक्षण करो, संगठन पर विश्वास रखो और अपनी मातृभूमी की सेवा का व्रत जारी रखो। यह अपनी कसौटी का क्षण हैं।’ असे म्हणत ’तुम्ही भारतात आल्यावर सर्व समस्या सुटतील,’ असा विश्वास तेथील सेविकांच्या मनात या माऊलीने जागवला.
ही माऊली आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख उंचावून अनेकांचे प्रेरणास्थान झाली आणि आपले जीवन कृतार्थ करून गेली.
 
 
 
हिंदूराष्ट्राला शक्तिसंपन्न करून त्याला परम्वैभवाकडे नेण्यासाठी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्त्रीशक्तीला राष्ट्रशक्ती बनवण्याचा मार्ग वं. मावशी केळकर यांनी निवडला. स्त्रीशक्ती जागृतीचा वं. मावशींनी आरंभिलेला हा यज्ञ, आजही अगणित अशा सेविकांच्या संघटनेवरील नितांत श्रद्धा, परिश्रम व अजोड त्यागाच्या आहुतींनी सदोदित प्रज्वलित ठेवला जात आहे आणि जात राहील.वं. मावशींचा जीवनपट मांडताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या असंख्य पैलूंचे असाधारणत्व जाणवत आणि शब्द अपुरे पडतात. ध्येयावर नितांत श्रद्धा असलेले, अविरत परिश्रम करणारे, वरवर शांत, संयत भासणारे व्यक्तिमत्त्व दूरदृष्टीने एवढा मोठा असाधारण विचार करत आणि म्हणूनच ते व्यक्तिमत्त्व वंदनीय होत.
 
 
देखणी ती जीवने जी
तृप्तीची तीर्थोदके चांदणे
त्यातून फाके शुभ पार्‍यासारखे ।
 -अपर्णा पाटील- महाशब्दे 
9823766644
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.