"सत्तेसाठी नाही तर विचारांसाठीच शिवसेनेचा मुख्यमंत्री"

05 Jul 2022 18:33:50
 
devendra
 
नागपूर : "मला पुन्हा मुख्यमंत्री होता आले नाही याचे नाही तर महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास थांबला याचेच जास्त दुःख होते" अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर प्रथमच फडणवीस नागपूरला भेट द्यायला आले होते. पंतप्रधानांच्या देशाला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवण्याच्या स्वप्नात महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनून मोठा वाटा उचलू शकला असता पण महाविकास आघाडीने विकासाचे सगळे प्रकल्प थांबवले त्यामुळे अडीच वर्षांत राज्याचा विकासच थांबला होता असेही फडणवीस म्हणाले. कोरोनाच्या काळातसुद्धा जीवाची पर्वा न करता महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि लोकांच्या आरोग्याची कुठेही हेळसांड होत नाही ना याकडे लक्ष दिले होते असे फडणवीस म्हणाले.
 
 
" राज्याचा विरोधीपक्षनेता म्हणून काम करत असताना महाविकास आघाडीतील अंतर्विरोध मला रोज दिसत होता, शिवसेनेच्या आमदारांच्या मनातील खदखद मला दिसत होती, त्यांच्या जीवावर इतर पक्ष कसे मजबूत होत होते त्यामुळे त्यांची होणारी तगमग मी बघत होतो आणि त्याचमुळे शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेना नेतृत्वविरोधात उठाव केला आणि त्यांच्या त्या उठावाला आम्ही साथ दिली" शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उठवावर फडणवीसांनी अशी प्रतिक्रिया दिली.
 
 
 
"आम्ही आग्रह केला असता तर आम्हांला मुख्यमंत्रीपद नक्कीच मिळाले असते पण ज्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आम्ही एकत्र आलो होतो त्या विचारांसाठीच आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री केले. सुरुवातीला या सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय मी घेतला होता पण शेवटी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या आणि यांच्याच आग्रहापोटी मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले" अशा शब्दांत आपल्या उपमुख्यमंत्री पद स्विकारण्याच्या निर्णयाचे समर्थन फडणवीसांनी केले. पक्ष देईल ती जबाबदारी मी आनंदाने सांभाळेन, माझ्या या निर्णयामुळे कोणीही नाराज नाही अशा शब्दांत फडणवीसांनी या बद्दल वावड्या उठवणाऱ्यांना सुनावले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0