ज्ञानवापी प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जुलै रोजी

05 Jul 2022 12:35:39

gyanvapi
नवी दिल्ली : न्यायालयाच्या सुट्टीनंतर काशिविश्वनाथ-ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी सोमवारी पार पडली. यावेळी मुस्लीम पक्षाने आपल्या ५१ मुद्द्यांवर युक्तिवाद केला. याप्रकरणी पुढील सुनावणी १२ जुलै रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाराणसी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ‘प्रार्थनास्थळ कायदा, १९९१’ नुसार हा खटला सुनावणीयोग्य नसल्याचा मुस्लीम पक्षाचा दावा असून त्याविषयी त्यांच्यातर्फे युक्तिवाद सुरू आहे.सोमवारीदेखील मुस्लीम पक्षाने युक्तिवाद करताना हा खटला सुनावणी करण्यायोग्य नसल्याचा दावा केला. सुनावणीवेळी मुस्लीम पक्षाचे वकील अभयनाथ यादव यांनी आपल्या एकूण ५२ पैकी ५१ मुद्द्यांवर युक्तिवाद पूर्ण केला. पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने दि. १२ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. यावेळी मुस्लीम पक्षाचा युक्तिवाद पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
 
 
 
मुस्लीम पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर हिंदू पक्षातर्फे युक्तिवाद केला जाणार आहे. दरम्यान, सुनावणीपूर्वी हिंदू पक्षाने भगवान काशिविश्वनाथाचे दर्शन घेतले. त्यावेळी वकील विष्णू शंकर जैन उपस्थित होते. ते म्हणाले की, मुस्लीम बाजूने हे प्रकरण सुनावणीयोग्य नसल्याचा युक्तिवाद केला आहे. मात्र, हे प्रकरण सुनावणीयोग्य असल्याचा हिंदू पक्षाचा दावा असून त्यासाठी न्यायालयासनोर करावयाच्या युक्तिवादाची पूर्ण तयारी झाली आहे. ज्ञानवापी परिसरात पूजा करण्याची हिंदू पक्षाची मागणी कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचेही जैन यांनी यावेळी नमूद केले आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0