रायगडसह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर

05 Jul 2022 17:08:00
monsoon७१
 
 
मुंबई: रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस मंगळवार दि. ०५ आणि बुधवार दि. ६ रोजी अतिमुसळधार पावसाच्या इशारा देण्यात आला आहे. याबाबत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना आणि यंत्रांना संपूर्ण सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
जुन महिन्यात दडी मारलेल्या पावसाने, जुलैमध्ये जोरदार कमबॅक केला आहे. मुंबईसह रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, आणि सातारा मध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी गाठायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सगळीकडे बचाव यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. सोमवारी दि. ०४ रोजी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या बहुतांश भागात पाणी साचले होते. दादर, माटुंगा, सायन येथील अनेक सखल भागात पाणी साचले होते.
 
 
कोकण किनारपट्टी भागात कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिला आहे. पुढील पाच दिवस मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रीय राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, आणि सातारा या जिल्ह्यांना पुढील २ दिवस (दि. ५ आणि दि. ६) रेड अलर्ट देण्यात आला हे तसेच मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0