वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    05-Jul-2022
Total Views |
रेल्वे
 
 
 
मुंबई:  मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले 24 तासात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा या वेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला.
 
 पावसामुळे  रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी उपनगरी रेल्वे विभाग, बेस्ट, मुंबई महापालिका यांनी समन्वय साधून लोकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी. तसेच त्यांना नाश्ता पाणी याची देखील सोय करावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने तत्काळ कारवाई करावी.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही द्वारे संपूर्ण पावसाच्या सद्यस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवून सर्वसामान्य नागरिकांना पावसामुळे कुठे अडचणीत सापडल्यास तत्काळ मदत करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.
 
आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबई शहर उपनगरात नियंत्रण कक्षातून सुरू असलेली कार्यवाही या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. मुंबई शहर उपनगरात पावसामुळे झाडे अथवा फांद्या पडल्याच्या घटना, सरासरी पडलेला पाऊस, पाण्याचा निचरा संथगतीने होणारी ठिकाणे, वाहतूक व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, रोजचे अहवाल अद्ययावत करण्याबाबतची माहिती देण्यात आली.
 
यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शर्मा, डॉ. संजीव कुमार, पी.वेलारासू, आपत्कालीन संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी संगीता लोखंडे, उपायुक्त यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.