हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मणिमेकलाईविरोधात गुन्हा दाखल

05 Jul 2022 19:58:13
 

नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : ‘काली’ या चित्रपटाद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चित्रपटाच्या कॅनडास्थित निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्याविरोधात लखनऊ आणि गोंडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्यावर उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील हजरतगंज पोलिसांनी पोलिसांनी काली या चित्रपटाच्या पोस्टरद्वारे धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लीना यांच्यावर धार्मिक भावना भडकावणे आणि लशांततेचा भंग करणे अशा गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे.


त्यांच्याविरोधात भादंवि कलम १२० ब, १५३ ब, २९५, २९५ अ, २९८, ५०४, ५०२ (१)(ब), ५०५ (२), माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ आणि ६७ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. मणिमेकलाई यांच्यासह प्रोड्युसर आशा असोसिएट आणि एडिटर श्रवण ओनाचन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. हजरतगंज पोलिसांसह गोंडा पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा सत्य संस्थेचे अध्यक्ष रितेश यादव यांनी तर लखीमपुर खिरी येथे सदर पोलिस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील गुन्हा दाखल केला आहे.


कॅनडातील भारतीय उच्चायोग सक्रिय


कॅनडातील टोरंटो येथे राहणाऱ्या लीना मणिमेकलाई यांनी २ जुलै रोजी चित्रपटाचे पोस्टर सार्वजनिक केले होते. यानंतर सोमवारी कॅनडातील भारतीय उच्चायोगाने स्थानिक प्रशासनाला चित्रपटातील भडकाऊ सामुग्री आणि साहित्य त्वरित मागे घेण्याची विनंती केली. भारतीय उच्चायुक्तांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्हाला कॅनडामधील हिंदू समुदायाच्या नेत्यांकडून आगा खान संग्रहालय, टोरंटो येथे अंटर द टेंट अंतर्गत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरवर हिंदू देवी-देवतांचे अपमानकारक चित्र असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आम्ही कॅनडामधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. आम्ही कॅनेडियन अधिकारी आणि कार्यक्रम आयोजकांना असे सर्व साहित्य मागे घेण्याचे आवाहन केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


काय आहे प्रकरण ?
 

काली चित्रपटाचे पोस्टर येताच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये एका महिलेला देवी कालीच्या रुपात दाखविण्यात आले आहे. एका हातात त्रिशूळ आणि एका हातात समलैंगिक समुदायाच्या सप्तरंगी ध्वज दाखविण्यात आला आहे. यामध्ये देवी कालीच्या रूपातील महिलेस सिगारेट ओढतानाही दाखविण्यात आले आहे. याविरोधात हिंदू समाजाने त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.





Powered By Sangraha 9.0