मानसिक कल्याण महत्त्वाचे

05 Jul 2022 14:38:19
मेंटल
 
 
 
 
 
ज्यांचे मानसिक कल्याण परिस्थिती चांगली असे लोक दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगतात. उत्तम गुणवत्ता वा दर्जा असलेले आयुष्य या लोकांना जगणे अधिक सोपे जाते, शिवाय अशा लोकांच्या सामाजिक समस्यांशी फारसा संबंध नसतो. मानसशास्त्रात असे आढळून आले आहे की, उच्च पातळीवरचे मानसिक आरोग्य जगणार्‍या लोकांमध्ये गुन्हेगारी किंवा व्यसनाधिनता यांचा धोका फार कमी प्रमाणात आढळतो. सकारात्मक मानसिकतेमुळे अशी लोक उच्च प्रतीची कमाई करतात.
 
 
 
मानसिक कल्याणाची (मेंटल वेल बीईंग) भाषा जेव्हा आपण विचारात घेतो, तेव्हा स्वायतत्ता, पर्यावरणीय प्रभुत्व, वैयक्तिक विकास, समाजाशी सकारात्मक संबंध, जीवनातील उद्देश आणि स्वस्वीकृती या सहा घटकांबद्दलचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. ‘कोविड’ महामारीच्या दुर्दैवी प्रभावातून जाताना आपल्या सगळ्यांच्या लक्षात मानसिक आरोग्याचे महत्त्व आलेले आहे. पूर्वीपेक्षा आता मानसिक आरोग्य जगासाठी आणि व्यक्तिगत जगण्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रावर त्याचा परिणाम होत असतो. मानसिक कल्याणाचे महत्त्व आपण जे जे काही कृतीतून करतो, विचारात घेतो किंवा संबोधतो, त्या त्या प्रत्येक गोष्टीशी आहे.
 
 
मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची व आपल्या मानसिक कल्याणाचे संवर्धन करण्याची अनेक कारणे आहेत. आपले विचार, वर्तन व भावना सामान्य स्थितीपासून ते संकट काळापर्यंत, स्थिरावण्यासाठी मानसिक कल्याणाची संकल्पना वाढू शकते. आपल्या स्वत:च्या प्रतिमेचे संवर्धन होऊ शकते आणि आपले नातेसंबंध सुधारू शकतात. मानसिक कल्याणाच्या जोपासनेने केवळ आपली दैनंदिन विधायकताच वाढते असे नाही, मन प्रसन्न आणि समाधानी राहते. एवढेच नाही, तर जीवनशैलीशी आणि मानसिक आरोग्याच्या परिस्थितीशी थेट संबंधित असलेल्या काही मनोकायिक समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास किंबहुना कमीत कमी लढा देण्यासदेखील मदत करू शकते. उदाहरणार्थ - हृदयविकार आणि मानसिक तणाव यांचा घनिष्ट संबंध आहे. त्यामुळे तणावाचे व्यवस्थित नियोजन केल्याने हृदयविकारासारख्या गंभीर विकारावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
 
मानसिक आणि शारीरिक आरोग्य मूलभूतपणे जोडलेले आहे. मानसिक आरोग्य आणि दीर्घकालीन राहणारे शारीरिक आजार यांच्यात अनेक पातळीवर जे संबंध आहेत, त्याचा लोकांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर, त्याचप्रमाणे आरोग्यसेवांच्या मागणीवर आपण परिणाम झालेला पाहतो. एकूणच आज ज्या जीवनशैलीविषयी आजारांमुळे माणसाची जीवनशैलीची गुणवत्ता कमी होऊ लागली आहे. त्यात मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे महत्त्व किती गंभीर आहे, याचे पुरावे सापडतात.
 
 
बिघडलेले मानसिक आरोग्य दीर्घकालीन शारीरिक रोगासाठी एक जोखमीचा घटक आहे, ज्या लोकांना गंभीर मानसिक आरोग्याची समस्या आहे, त्या लोकांना दीर्घ शारीरिक आरोग्याच्या समस्या व गुंतागूंत होऊन त्यामुळेच त्यांचा मृत्यू होतो, याशिवाय ज्यांना दीर्घ अशा शारीरिक आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांना मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्या होऊन त्यांच्या आयुष्याचा दर्जा ढासळतो, यासाठीच एकंदरीत आरोग्याच्या समस्यांसाठी मन आणि शरीर यांच्यातील दुवे समजून घेणे, ही त्याच्या सहअस्तित्वाच्या धोके कमी करण्यासाठी जितके आवश्यक आहे, त्याहीपेक्षा आधीपासून मानसिक आजार आणि शारीरिक आजार एकत्रितपणे घेऊन जगणार्‍यांना आधार देण्यासाठी जी आरोग्यपूर्ण धोरणे लागतात, त्या विकसित करण्यासाठीही आवश्यक आहे.
 
ज्यांचे मानसिक कल्याण परिस्थिती चांगली असे लोक दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगतात. उत्तम गुणवत्ता वा दर्जा असलेले आयुष्य या लोकांना जगणे अधिक सोपे जाते, शिवाय अशा लोकांच्या सामाजिक समस्यांशी फारसा संबंध नसतो. मानसशास्त्रात असे आढळून आले आहे की, उच्च पातळीवरचे मानसिक आरोग्य जगणार्‍या लोकांमध्ये गुन्हेगारी किंवा व्यसनाधिनता यांचा धोका फार कमी प्रमाणात आढळतो. सकारात्मक मानसिकतेमुळे अशी लोक उच्च प्रतीची कमाई करतात. समाजकल्याणासाठी आवश्यक गोष्टी करतात.
 
राजकीय पातळीवर यासाठी मानसिक आरोग्याचे संवर्धन आणि मानसिक कल्याणासाठी आवश्यक धोरणे राबवली जाणे आवश्यक आहेत, लोकांच्या मूलभूत गरजा जेव्हा पूर्ण होतात वा त्यासाठी त्यांना अमर्याद लढावे लागत नाही, तेव्हाच त्यांना सकारात्मक मानसिक आरोग्याचा आनंद घेता येतो. आपण जेथे राहतो तो परिसर सुरक्षित असला, पुरेसे अन्न आणि पुरेसा निवास असणे, हे मानसिक कल्याणदायी स्थितीसाठी महत्त्वाचे घटक ठरतात. आज श्रीलंकेत दिवाळखोरीमुळे लोकांना सामान्य पातळीवर जगणे अशक्य झाले आहे.
 
 
उद्याची नाही, तर आजच्या जगण्याच्या चिंतेने ते सैरभैर झाल्याने आज ते आक्रमक झालेले आहेत. तिथे दंगे, जाळपोळ चालली आहे. कारण, त्यांचे जगणे कठीण झाले आहे. भयंकर निराशेने ते ग्रस्त झाले आहेत. आपल्या आयुष्यात दैनंदिन जीवनात आपण आनंदी असतो, समाधानी असलो, तर मनाची स्थिती प्रसन्न असते. आपण आपल्या हातून काहीतरी चांगले घडावे, यासाठी प्रयत्नही करतो. मनाची सक्षमता व्यक्तीला सुरक्षिततेची हमी देते. सामाजिक आधार आपल्यापाठीशी आहे, याचे भान देते.
 
 
-डॉ शुभांगी पारकर   
Powered By Sangraha 9.0