'तारक मेहता...' मध्ये किरण भट्ट साकारणार 'नट्टू काका'

    04-Jul-2022
Total Views |

nattu kaka
 
 
मुंबई : गेली अनेक वर्षे फक्त हिंदीच नाही तर बहुभाषिक प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उलटा चश्मा'. गेले अनेक दिवस या मालिके बाबत सतत नवनवीन चर्चा सुरू आहेत. काही कलाकार मालिका सोडून जात आहेत तर काही नव्याने येत आहेत. त्यामुळे आता अशीच एक एंट्री होणार आहे ती नव्या 'नट्टू काका'ची. मागील एक वर्ष सर्वांनाच नट्टू काका या पात्राची कमी जाणवत होती. पण आता पुन्हा एकदा किरण भट्ट यांच्या रूपाने मालिकेत नवीन नट्टू काका येत आहेत. आता प्रश्न आहे हे किरण भट्ट नेमके कोण आहेत?
 
 
 
 
 
या मालिकेचे चाहते आजही 'नट्टू काका'ना म्हणजेच घनश्याम नायक यांना आजही विसरू शकले नाही आहेत. कारण तब्बल १३ वर्षे त्यांनी ही भूमिका साकारली होती. परंतु, कॅन्सरशी सामना करत गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी आता किरण भट्ट हे 'नट्टू काका'च्या भूमिकेत येत आहेत.
 
 
 
 
 
नट्टू काका या पात्राला साजेशी व्यक्तिरेखा शोधणे थोडे कठीण होते परंतु, निर्माते आसित मोदी यांनी ते शक्य करून दाखवले आहे. किरण भट्ट हे देखील गेली बरीच वर्षे ते रंगभूमीवर काम करत आहेत. किरण भट्ट यांनी आजवर नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप चाहत्यांवर पाडली आहे. ते अनेक वर्ष गुजराथी रंगभूमीवर सातत्याने काम करत आहेत. एवढेच नाही तर 'तारक मेहता' या मालिकेचे निर्माते असणाऱ्या असित मोदी यांनीही एकेकाळी किरण यांच्या हाताखाली काम केले आहे. 'मी जेव्हा नाटकात काम करत होतो, त्या दिवसांमध्ये किरण भट्ट हे माझे निर्माते होते' असे स्वतः असीत मोदी यांनी सांगितले आहे.
 
 
 
 
 
त्याचबरोबर या मालिकेतील अनेक कलाकारांचे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीयांनी देखील त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केले होते. स्वतः घनश्याम नायक आणि किरण भट्ट चांगले मित्र होते. तब्बल २० वर्षे या दोघांनी एकत्र एका गुजराथी नाटकांत काम केले होते. 'रंगीला' 'सत्या' चित्रपटांतून तर ''क्युकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून ते घराघरात पोहोचले आहेत. आता ''नट्टू काका' ही भूमिका साकारण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.