'टाइमपास ३' लवकरच चित्रपटगृहात !

    04-Jul-2022
Total Views |


timepass
 
 
 
 
 
मुंबई : महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना वेड लावणारा मराठी चित्रपट म्हणजे रवी जाधव यांचा 'टाइमपास'. प्रेक्षकांनी या चित्रपटाला एवढा प्रतिसाद दिला की काहीच दिवसांत त्याचा दुसरा भाग देखील आला . या दोन भागांच्या यशानंतर आता तिसरा भाग 'टाइमपास ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे आता दगडू आणि प्राजक्ताची लव्हस्टोरी पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता नेमकी काय गोष्ट असणार आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
 
 
 
 
 
'आई -बाबा आणि साईबाबा'ची शपथ असे म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीही दोन भागांमध्ये बघितले आहे. दगडूचे हेच साईप्रेम 'टाइमपास ३' मध्येही पाहायला मिळणार आहे.नुकतेच या चित्रपटातील 'साई तुझं लेकरू' हे गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून साईबाबांच्या चरणी दगडूचे कुटुंब आणि मित्र प्रार्थना करताना दिसत आहेत. या गाण्यात भाऊ कदम म्हणजेच दगडूचे वडील साईबाबांसमोर आभार मानत, दगडू तुमचाच लेकरू आहे व दगडूवर तुमची कृपा कायम अशीच राहू देत, असेही ते सांगत आहेत. हे गाणे भाऊ कदम, प्रथमेश परब, आरती वडगबाळकर, मनमीत पेम, ओंकार राऊत आणि जयेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. 'तुझा हात असताना आता कुणाला घाबरू.. जिंकून आलंया साई तुझं लेकरू' अशा या गाण्याच्या ओळी आहेत.
 
 
या गाण्याचे गीतकार क्षितीज पटवर्धन आहेत तर या गाण्याला अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे आणि त्याचबरोबर अमितराज आणि आदर्श शिंदे यांनी ते म्हटले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे आणि संजीव होवलादार यांनी केले आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या 'टाइमपास ३' चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून यात दगडूच्या आयुष्यात आलेल्या 'पालवी' भूमिका हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. 'टाइमपास ३' २९ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.