काश्मीरमध्ये गावकर्‍यांनीच २ दहशतवाद्यांना दिले पोलिसांच्या ताब्यात; ‘एके-४७’, ग्रेनेड जप्त

04 Jul 2022 18:00:52
two terrorists
 
 
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांना रविवारी गावकर्‍यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या दहशतवाद्यांपैकी एकजण हा ‘लष्कर’चा ‘मोस्ट वॉण्टेड’ कमांडर असल्याचे समजते. तसेच अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर कमांडर तालिब हुसैन, राजौरी जिल्ह्यातीलरहिवासी आणि पुलवामामधील फैजल अहमद दार यांचादेखील समावेश आहे. या दोघांना तुकसान या गावात पकडण्यात आले. नुकत्याच झालेल्या ‘आयईडी’ स्फोटांचा फैसल ‘मास्टरमाईंड’ असल्याची माहितीही समोर आली आहे.
 
तसेच अटक करण्यात आलेल्या या दोन्ही दहशतवाद्यांकडून दोन ‘एके-४७’ रायफल, सात ग्रेनेड आणि एक पिस्तूलही पोलिसांनी जप्त केली आहे. गावकर्‍यांच्या या धाडसी कारवाईनंतर पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दहशतवाद्यांना पकडून देणार्‍या गावकर्‍यांना त्यांच्या शौर्याबद्दल दोन लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केले आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या धाडसी गावकर्‍यांना पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
 
यापूर्वी दि. ३० जून रोजी भारतीय लष्कराच्या ‘चिनार कॉर्प्स’ने जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. बुधवारी कुलगाममध्ये झालेली चकमक अमरनाथ यात्रेच्या मार्गाच्या नजीक झाल्याचे समजते. पोलिसांनी याविषयी सांगितले की, संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली आणि परिसराची नाकेबंदी करण्यात आली. त्यावेळीही एक ‘एके-४७’रायफल, एक पिस्तूल जप्त करण्यात आले होते.
 
Powered By Sangraha 9.0