आरे कारशेडमध्ये सध्या काय सुरू आहे?

29 Jul 2022 15:52:38
आरे
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक २९ नोव्हेंबर २०१९चे आदेश रद्द केले, आणि आरे येथील मेट्रो कारशेडचे काम पुन्हा सुरू करण्यास मुंबई मेट्रो रेल कॉर्परेशनला आदेश दिले. त्यानुसार डेपोमध्ये प्राथमिक कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये मुख्यतः साफ सफाई आणि जमीन सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
 
 
याचबरोबर डेपोचे मुख्य काम सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ यांची उपलब्धता करून देण्याचे काम कंत्राटदारांनी सुरू केले आहे. हे सर्व काम मा. सर्वोच्च न्यायालय, मा. मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या सर्व आदेशांचे काटेकोर पालन करून करण्यात येत आहे. तसेच मेट्रो ट्रेनची प्रारंभिक डिझाईन चाचणी करण्यासाठी आरे डेपो बाहेरील सरीपुतनगर येथील रॅम्प नजिक ट्रेनचे डबे उतरविण्यात येणार आहेत. त्यांची जुळवणी करण्यासाठी तात्पुरती सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने निर्णय पारित केला होता.
 
 
ही सुविधा मरोळ मरोशी मार्गाजवळील बोगद्याच्या तोंडाशी आहे. आठ डब्यांची एक ट्रेन आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे तयार करण्यात आली आहे. या ट्रेनचे मुंबईत आगमन झाले आहे. याच मेट्रो ट्रेनच्या प्रारंभिक डिझाईन चाचण्या आता सुरू होणार आहेत. कारशेड डेपोचे काम आणि डबे उतरवून घेण्यासाठीची सुविधा ही वेगवेगळी कामे असून एकाच वेळी हाती घेण्यात आलेली आहेत.
 
 
कुठल्याही मेट्रो प्रकल्पासाठी कार डेपो अतिशय महत्त्वाचा असतो. येथे ट्रेनची देखभाल रोज होते. तसेच प्रतिबंधात्मक, सुधारात्मक आणि दुरुस्तीची कामे येथे हाती घेण्यात येतात. यामुळे सर्व ट्रेन्स सुरळीतपणे धावण्यास मदत होते. प्रवाशांचा दैनंदिन प्रवास आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित ठरण्या साठी कार डेपो एक महत्त्वाचा दुवा ठरतो. येथेच ट्रेन्स उभ्या करण्याची सुविधा असते.
 
 
त्याच प्रमाणे चाकांची काळजी घेणे, ट्रेनची सफर सुरक्षित होण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चाचण्या सुविधा उपलब्ध असतात. येथेच संचलन आणि नियंत्रण कक्ष देखील उपलब्ध असतो. मरोळ मरोशी मार्ग, सारीपुत नगराजवळील रॅम्प पासून मरोळ नाका मेट्रो स्थनाकापर्यंतच्या ३ कि.मी. लांबीच्या ट्रॅकवर प्रोटोटाइप ट्रेनच्या चाचण्या होणार आहेत. येथेच उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या सुविधेत ट्रेन पार्क करण्यात येणार आहे. आरे मेट्रो कारशेड डेपोचे काम पूर्ण करून सीप्झ ते बी.के.सी.पर्यंतचा पहिला टप्पा २०२४ च्या पहिल्या तिमाहीत सुरू करण्याची 'एमएमआरसीएल'ची अपेक्षा आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0