केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे धारावीकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार – खासदार राहुल शेवाळे

29 Jul 2022 19:54:27
shewale

रेल्वेची ४५ एकर जमीन महिन्याभरात हस्तांतरित होणार
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : धारावी पुनर्विकासासाठी आवश्यक रेल्वे खात्याची ४५ एकर जमीन महिन्याभरात राज्य सरकारकडे हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सहकार्याने धारावीकरांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होईल, असे प्रतिपादन दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी दैनिक 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना केले.
 
खासदार शेवाळे म्हणाले, धारावी पुनर्विकास प्रकल्प आता मार्गी लागण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे खात्याच्या अखत्यारितील ४५ एकर जागा मिळणे आवश्यक होते, मात्र त्यास विलंब होत असल्याने संपूर्ण प्रकल्प रखडला होता. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांच्या या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते.
 
त्यानुसार, केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी रेल्वेच्या अखत्यारित असलेली ४५ एकर जागा एक महिन्याच्या आत राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अखेरिस केंद्र सरकारच्या सहकार्याने धारावीकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचेही खासदार शेवाळे यांनी यावेळी नमूद केले.
 
 
खासदार शेवाळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांना २६ जुलै रोजी एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याची गरज व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे जमीन हस्तांतरणाबाबत रेल्वे खात्याकडून होणार विलंबही निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी त्यावर तातडीने कार्यवाही केली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0