केईएममध्ये साथीच्या रुग्णांमध्ये वाढ

27 Jul 2022 18:20:08
 
kem
 
 
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला होता. आता काही अंशी जरी पावसाने उसंत घेतले असले तरी साथीच्या रोगांनी मात्र डोकं वर काढण्यास सुरवात केली आहे. मुंबईत सध्या ताप, सर्दी, खोकला तसेच डेंगू मलेरिया सारख्या इतर साथीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या परेल मधील केईएम रुग्णालयात साथीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. केईएमच्या जनरल वॉर्डामध्ये सध्या रुग्णांना खाटा मिळणेही मुश्किल झाल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील इतर वॉर्डांमधील रिकाम्या खाटा वापरण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे तसेच मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. केईएम रुग्णालयात साथीच्या आजारांच्या रुग्णांना व्यतिरिक्त इतरही अनेक आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचार घेत आहेत. परंतु सध्या डेंगू, मलेरियासह इतर साथीच्या आजारांचे रुग्ण वाढल्याने रुग्णालयातील ४ ए या मेडिसीन विभागा सोबतच जवळपास सर्वच वॉर्ड हे गर्दीने भरले असल्याचे निदर्शनास येत आहे.
 
कोविड काळामध्ये केईएम रुग्णालयात सोशल डिस्टन्सिंग ठेवता यावे म्हणून मोठ्या आकाराच्या खाटा आणण्यात आल्या होत्या. त्यामुळे एका वॉर्डमध्ये केवळ ५० खाटा ठेवता येत आहेत. परंतु आता रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सर्वच वॉर्डांमध्ये खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. केईएम रुग्णालयाकडे अधिक खाटा उपलब्ध आहेत. परंतु या खाटा वॉर्डमध्ये ठेवण्यासाठी मात्र जागा नाही.
Powered By Sangraha 9.0