मुंबई : शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी मोठा उठाव करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडले. शिंदे यांच्या उठावानंतर शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबर गेलेल्या सर्वच आमदार खासदारांना अत्यंत अर्वाच्य भाषेत अद्वातद्वा बोलले गेले. दिवसेंदिवस या दोघांमधील संघर्ष चिघळत चालला आहे. या सगळ्या शिगेला पोहोचलेल्या संघर्षात एक नवाच ट्विस्ट आला आहे. तो म्हणजे स्मिता ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतलेली भेट.
एक रिसेप्शनिस्ट ते ठाकरे कुटुंबातील राजकीय महत्वाकांक्षा असलेली व्यक्ती हा स्मिता यांचा प्रवास बघितलं तर या भेटीचे महत्व लक्षात येते. उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांची पत्नी ही त्यांची ओळख असली तरी ठाकरे घराण्यातील सत्ता संघर्षात त्यांचे नाव कायम चर्चेत राहिलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेतील त्यांचा उत्तराधिकारी कोण? या साठी जेव्हा संघर्ष सुरु झाला तेव्हा उद्धव, राज यांच्या बरोबरीने स्मिता यांचेही नाव त्यावेळी चर्चेत होते. पण शिवसेनेची धुरा जेव्हा उद्धव ठाकरेंकडे गेली तेव्हापासून स्मिता यांचे नाव सक्रिय राजकारणातून बाजूला पडत गेले. यानंतर त्यांनी चित्रपटनिर्मिती या क्षेत्राकडे लक्ष वळवले तरी त्यांची राजकीय महत्वाकांक्षा तेव्हाही लपून राहिली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर ठाकरे घराण्यातील वादंग प्रॉपर्टीच्या निमित्तबे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले तेव्हा २०१६ साली स्मिता यांनी त्यांचे पती जयदेव ठाकरे यांच्याशी घटस्फोट घेतला पण मातोश्री सोडले नाही. राज यांच्यासारखेच स्मिता यांच्याही महत्वाकांक्षांचे पंख वेळोवेळी पद्धतशीरपणे छाटण्यात आले आहेत. २००८ - ०९ मध्ये जेव्हा त्या राज्यसभा खासदारकीसाठी प्रयत्नशील होत्या तेव्हा त्यांना अलगदपणे बाजूला केले गेले.
जरी स्मिता ठाकरे यांचे नाव सक्रिय राजकारणात कायम चर्चेत येत जरी नसले तरी त्यांच्या भोवतीचे ठाकरे नावाचे वलय असणे हीच खूप मोठी गोष्ट आहे. आज जरी स्मिता मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच्या त्यांची भेट सदिच्छा भेट होती असे सांगत जरी असल्या तरी या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. स्मिता ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्रितपणे उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण करणार का ? शिंदे गटाच्या उठवाला आता खुद्ध ठाकरेंच्या घरातूनच पाठिंबा मिळायला सुरुवात झाली आहे का ? शिवसेनेतील नव्या फुटीची ही नांदी ठरणार का? या सर्वच प्रश्नांची उत्तरे आता येणार काळच ठरवेल.