...म्हणून उमेश कोल्हे प्रकरणातील आरोपी शाहरुखला बदडले!

27 Jul 2022 20:23:44

news



मुंबई :
नुपूर शर्माच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हेंची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपीपैकी शाहरुख पाठणला ऑर्थर रोड तुरुंगात बेदम मारहाण झाली आहे. २३ जुलै रोजी पाच जणांनी पठाणला बेदम चोप दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
उमेश कोल्हे प्रकरणाचा तपास सध्या एनआयएकडे वर्ग करण्यात आला असून अद्याप सात जणांना अटक झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्थर रोड तुरुंगातील सर्कल ११, बराक क्रमांक दोनमध्ये २३ जुलै रोजी कुणाला कुठल्या कारणास्तव अटक झाली याबद्दल चर्चा सुरू होती. शाहरुख पठाण उर्फ बादशाहने उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अटक झाल्याचे सांगितले.
 
 
नूपुर शर्माच्या वक्तव्याचे समर्थन केले म्हणून अमरावतीतील फार्मासिस्ट उमेश कोल्हेंची हत्या झाल्याची चर्चा आरोपींमध्ये झाली. यामुळे बराकमध्ये उपस्थित अन्य आरोपींच्या शाहरुखबद्दल द्वेश निर्माण झाला. त्यामुळे ही मारहाण केल्याची तक्रार तुरुंग अधिकारी, मुंबई मध्यवर्ती कारागृह अमोल चौरे यांनी दाखल केली आहे. या प्रकरणी ना.म.जोशी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली. 
 
 
शाहरुखवर हल्ला केल्या प्रकरणी कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रावण आवण आणि संदीप जाधव यांच्याविरोधात तुरुंग अधिकारी अमोल चौरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३ अंतर्गत तुरुंगाची शांतता भंग करणे व कैद्याच्या मनात भीती दाखल केल्या प्रकरणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल काकळीज यांनी गुन्हा नोंद करुन घेतला आहे.
 
या प्रकरणाची दखल घेत तुरुंग प्रशासानाने या सर्वांना बाजूच्या बराकमध्ये हलवले आहे. त्यानंतर उमेश कोल्हे प्रकरणातील धास्तावलेल्या अन्य आरोपींनी वेगळ्या तुरुंगात हलवण्याची विनंती न्यायालयात अर्जाद्वारे केली आहे, अशी माहिती संबंधित सुत्रांनी दिली.

 
काय आहे उमेश कोल्हे प्रकरण?


नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे समर्थन केले म्हणून अमरावतीतील फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सध्या एनआयएकडे आहे. यात आरोपी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) या सर्वांची एनआयएमार्फत चौकशी सुरू आहे.








Powered By Sangraha 9.0