‘पँथर’चा उदय अस्त आणि दलित समाज

26 Jul 2022 18:38:18

dalit panther



पँथरच्या वाटचालीत साहित्याचा भाग मोठा होता, ज्यातून राजकीय प्रवाह तयार झाला. पुढे ही चळवळ मुख्य प्रवाह बनण्यापेक्षा अन्य राजकीय पक्षांच्या वळचणीला गेली. पँथरचे चाहते आणि सहानुभूतीदार या सगळ्यांचा तोच आक्षेप आहे.
 
 
‘दलित पँथर’ या चळवळीला याच महिन्यात ५० वर्षे पूर्ण झाली. पँथरच्या कामाबद्दल वादविवाद होते, तसेच पँथरच्या स्थापनेबद्दलही होते. पँथरच्या संस्थापकांनी त्यांच्या हयायतीतच पँथरचा र्‍हास होताना पाहिला. ही चळवळ रुजू नये, यासाठी बाह्यशक्ती कारणीभूत होत्या, हा दलित चळवळीतील कार्यकर्त्यांचा लाडका दावा असला तरी पँथरच्याच नेतृत्वाचे या चळवळीला दिशा देण्याचे अपुरे पडलेले प्रयत्न आणि नंतरची फाटाफुट हेच खरे कारण होते. ७० ते ९०चा काळच मुळी भारतातल्या अराजकाचा होता. याची कारणे नेहरूंच्या सपशेल फसलेल्या समाजवादी धोरणात होती. हा काळ असा आहे की, या काळात दलितच नव्हे, तर जवळ जवळ सगळ्याच समाज गटातल्या तरुण वर्गात एक प्रकारचा क्षोभ होता. काव्य, चित्रपट, चित्र अशा सगळ्याच माध्यमात त्याचे प्रतिबिंब पडत होते.

 
नामदेव ढसाळ या अत्यंत प्रभावी कवी. या दलित तरुणाला दलितांच्या अवकाक्षात ही वेदना उत्तमरित्या गवसली. बेरोजगारी, महागाई, गिरण्या बंद पडणे, मेहनती माणसांनाही संधीचा अभाव, ठरावीक लोकांच्याच हाती एकवटलेली सत्ता आणि संसाधने याचा जो काही परिणाम व्हायचा, तो भारतासारख्या देशात होतच होता. सगळा समाजच यात पिचत असताना दलित समाज यापासून वेगळा कसा राहील? ढसाळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पँथरच्या माध्यमातून त्याला अभिव्यक्ती दिली. ही अभिव्यक्ती काव्याची होती, कार्यक्रमांची होती, राजकीय विचारांच्या संघटनेची होती. ही चळवळ मूळ राजकीय चळवळ झाली नाही. मात्र, प्रस्थापित राजकीय चळवळींना तिची भीती मात्र नक्कीच वाटत होती. महाराष्ट्राच्या बहुपक्षीय राजकीय वातावरणात पँथर आपल्यासोबत असावी असे प्रत्येक पक्षाला वाटत होते.
 

पँथर राजकारणातला मूळ प्रवाह होऊ शकत नाही, हे लक्षात आल्याबरोबर पँथरच्याच नेत्यांनी निरनिराळ्या राजकीय पक्षांची कास धरायला सुरुवात केली. आजच्या राजकीय भाषेत सांगायचे, तर पँथरने त्याकाळी बहुतांश मतदारसंघात स्वत:चा ‘व्होट शेअर’ तयार केला होता. मुंबई, पुणे वगैरेसारख्या शहरी भागात दलित तरुणांकडून पँथरला मिळणारा प्रतिसाद भरघोस होता. नामदेव ढसाळांची कविता दलितांवर होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडत होती. ही कविता वेदनेची होती, अन्यायाची होती, दु:खाची होती आणि त्याचबरोबर ती बंडखोरीची होती. प्रस्थापितांकडून आपले काहीच होऊ शकत नाही, हे सांगणारी ही कविता होती. ढसाळांचे ते काव्यसंग्रह आजही वाचले तरी अंगावर काटा येतो. मराठी काव्यात तर ढसाळांच्या कवितेने स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले. या साहित्याने विद्रोही साहित्य संमेलनाचे व समांतर साहित्यिक व्यासपीठाचे बीजही रोवले.
 
 
मराठीतल्या माध्यमांनी व साहित्यप्रेमींनी या विद्रोही साहित्यालाही चांगला प्रतिसाद दिला. तो नैसर्गिक होता. कारण, ढसाळ व त्यांच्या समकालिनांच्या कवितेत काव्याला लागणारा तो वेदनेचा भाव अस्सलपणे उतरवला होता. ढसाळांची पुस्तके एकामागोमाग लोकप्रिय होत गेली. देशातच नव्हे, तर परदेशातही त्याची भाषांतरे झाली. विद्रोही साहित्य हे समाजमान्यतेच्या शिखरावर चढू लागले असतानाच पँथरचा र्‍हास सुरू झाला होता. यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राजकीय नेतृत्वाचा होता. पँथरमध्ये डरकाळ्या फोडणारे सत्तेच्या मार्गी इतक्या चटकन लागले की, त्यांच्या समर्थनार्थ झटणार्‍या, रस्त्यावर उतरून संघर्ष करणार्‍या दलित तरुणांनाही त्याचे आश्चर्य वाटले आणि धक्काही बसला. ढसाळ शिवसेनेच्या वळचणीला गेले. शरद पवारांनी त्यावेळी रामदास आठवलेंचा पर्याय उभा केला आणि यशस्वीही करून दाखविला.

 
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापर्यंत या चळवळीची जागा आंदोलनात नेमकी कोणती, हा प्रश्नच उभा राहिला होता. गावागावांत बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला दिले जात नाही किंवा सहज होऊ शकणार्‍या गोष्टीसाठी इतका संघर्ष करावा लागतो, याविषयी दलित समाजात कमालीची चीड होती. संघर्षही होत होता. शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका त्यावेळी नामांतराच्या विरोधात होती. दलित समाजाची हेटाळणी करणारी त्यांची विधानेही त्यावेळी गाजली होती. संघ परिवार त्यावेळी बाबासाहेबांचे नाव देण्याच्या बाजूने होता. मात्र, त्यावेळी विरोधाचा सगळा रोख परिवाराच्या विरोधात फिरविला गेला. संघ परिवार व त्यावेळी वाढणार्‍या भाजपच्या विरोधात हे वातावरण कसे वापरता येईल, याचे राजकारण त्यावेळी पवार व काँग्रेस खेळत होती.



पँथरच्या र्‍हासाची कारणे यातच दडली आहेत. पँथरच्या उदयाबरोबरच विद्रोही साहित्याचा उदय झाला. स्वत: ढसाळ वगैरे मंडळींनी हिंदू धर्म व देवीदेवतांच्या विरोधात घाणेरड्या शब्दांत टीकाटिपण्णी केल्याचे आठवत नाही. तो संयम त्यांनी पाळला, मात्र प्रस्थापित हिंदू धर्मावर घाणेरड्या भाषेत लिहिणे, प्रतिमाभंजन करणे म्हणजे विद्रोही साहित्याची निर्मिती करणे, असे मानणारा एक वर्ग निर्माण झाला होता. दलित समाजात या तत्कालीन लिखाणाला लोकप्रियता मिळाली. मात्र, मान्यता नव्हती. कारण, दलित समाजातील एका मोठ्या वर्गाला अशा प्रकारच्या समाज तोडणार्‍या चळवळीत कोणताही रस नव्हता. ती तत्कालीन अभिव्यक्ती ठरली त्याला कायमस्वरूपी स्थान मात्र मिळाले नाही.


पँथरने निर्माण केलेला राजकीय प्रभाव आणि साहित्यिक प्रवाह मात्र या आतातायीपणामुळे खुंटला. पँथरकडे ज्या कौतुकाने समाजाने पाहिले, तो दुवाच निखळायला सुरुवात झाली. पँथरने महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण केले, खर्‍या अर्थाने ते काँग्रेस व शरद पवार यांच्या प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात होते. दलितांना राजकीय व्यवस्थेत नसलेले स्थान हाही एक मुद्दा होता. लोकशाहीच्या विविध सदनांमध्ये दलित नेतृत्वाला नसलेले स्थान हे त्याचे आकलन होते. पँथर किंवा रिपब्लिकनने हा मुद्दा स्वत:च्या पुरता सोडवला तो दलित समाजासाठी सुटला नाही.


त्यासाठी भाजपसारख्या मुख्य प्रवाहातील पक्षात सामील होऊनच त्या सामाजिक न्यायाची प्राप्ती त्यांना झाली. या घुसळतीतून निर्माण झालेल्या वातावरणाचा वापर तेव्हाही व आजही हिंदुत्व मानणार्‍या मंडळींच्या विरोधात केला जातो. पँथरच्या पन्नाशीच्या निमित्ताने याचे आकलन होणे आवश्यक आहे. दलित चळवळीची राजकीय गरज संपलेली नाही. लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया या राजकीय अभिव्यक्ती असतात, यात वावगेही काही नाही. मात्र, राजकीय न्याय मिळवून देण्यापेक्षा आपला वापर केला जात नाही ना याचा विवेक समूहगटांना करावा लागतो.




Powered By Sangraha 9.0