गरिबांची स्वप्ने भारतात पूर्ण होतातच! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

25 Jul 2022 18:50:16
 
 
murmu
 
 
 
नवी दिल्ली : देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी संसदेच्या केंद्रीय सभागृहात शपथ घेतली. देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी त्यांनी “भारतातील गरिबांनाही स्वप्ने असू शकतात आणि ती पूर्णही होऊ शकतात याचा पुरावा म्हणजे माझी राष्ट्रपतीपदी झालेली निवड आहे”, असे प्रतिपादन आपल्या औपचारिक भाषणामध्ये केले. यावेळी त्यांनी बिरसा मुंडा यांचेही स्मरण केले. 
 
स्वतंत्र्य भारतात जन्मलेल्या आणि वनवासी समुदायातील पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रामण्णा यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री, खासदार आणि राज्यांचे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
  
 
शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्या म्हणाल्या, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे हे माझे वैयक्तिक कर्तृत्व नसून भारतातील प्रत्येक गरीबाचे ते यश आहे. माझ्या निवडीद्वारे देशातील गरिबांनाही स्वप्ने असू शकतात आणि ती पूर्णही होतात, हे सिद्ध झाले आहे. शतकानुशतके वंचित राहिलेल्या, विकासाच्या लाभापासून दूर राहिलेल्या गरीब, दलित, मागासलेल्या आणि आदिवासींना त्यांचे प्रतिबिंब माझ्यात दिसत आहे. आज मी सर्व देशवासियांना, विशेषत: भारतातील तरुणांना आणि भारतातील महिलांना खात्री देतो की, या पदावर काम करत असताना त्यांचे हित माझ्यासाठी सर्वोपरि असेल, असे त्यांनी नमूद केले.
 
 
 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे आणि शिक्षणाचे स्मरण करून सांगितले की, नेताजी सुभाषचंद्र बोस, नेहरूजी, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांसारखे असंख्य स्वातंत्र्य सैनिक. राष्ट्राचा स्वाभिमान सर्वोच्च ठेवायला शिकवले. राणी लक्ष्मीबाई, राणी वेलू नचियार, राणी गाईदिनलुय आणि राणी चेन्नम्मा यांसारख्या अनेक नायिकांनी राष्ट्ररक्षण आणि राष्ट्र उभारणीत स्त्री शक्तीच्या भूमिकेला नवी उंची दिली होती, असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नमूद केले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0