काय खरे, काय खोटे?

24 Jul 2022 20:28:28

raut
 
देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “ ‘सेन्सेबल’ माणसाबद्दल बोलावं. पण तरीही संजय राऊतांची भाकिते बघितली की, वाटते माणसाला भाकड आणि खोटा आशावाद तरी किती असावा? त्यांचे म्हणणे ”आदित्य ठाकरेंच्या यात्रेत लोक रडली आणि त्यांच्या अश्रूमध्ये सध्याचे महाराष्ट्राचे सरकार म्हणे वाहून जाणार आहे.” हो... हो! हसू नका. त्यामागचे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चे तथ्य समजून घेऊ.
 
सध्याच्या प्रत्येक गोष्टीत ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा खूप मोठा हात आहे. नेत्याची यात्रा आली, तर त्या नेत्याला खूश करण्यासाठी लोकांची गर्दी जमवणे, त्या गर्दीत वृद्ध महिला-पुरुष आणि गरोदर स्त्रिया, दिव्यांग व्यक्ती हमखास असायला हव्यात. यासाठी त्यांना विशेष अगदी आग्रहाने आणणे. (काहींचे म्हणणे पैसे देऊन किंवा अमिष देऊनही आणले जाते) असो, मग तालीम सुरू होते. कोणी कधी काय बोलायचे? कसे नेत्याच्या पाया पडायचे, नेत्याला कसे भासवायचे की, ‘तुम्ही हो माता पिता तुम्ही हो...’ या नेत्याला अशी खात्री द्यायची की, आम्ही तर तुमचेच अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. त्यासाठी अधिच वयामुळे हळवे झालेल्या वृद्धांना वाईट वाटेल, दया येईल, असे वातावरण निर्माण करायचे. त्यांच्या डोळ्यात कोणत्याही कारणाने अश्रू तरळले, तर त्याचा ‘क्लोजअप सीन’ घ्यायचाच, हे आधीच ठरलेले. सगळ्या घडवून आणलेल्या घटनांचे यथासांग व्हिडिओ बनवले जातात, फोटो काढले जातात. रिल्स काय, युट्यूब काय, प्रसारमाध्यमांचा अगदी दणकून वापर केला जातो. हे सगळे पाहून लोकांच्या मनावर ठसवले जाते की बघा, हाच काय तो लोकनेता! या नेत्याला पाहूनच लोक जगतात आणि या नेत्याला सत्ता देण्यासाठीच लोक श्वास घेतात. काही ठराविक लोक मग यावर चर्चा घडवतात. नेता महान आहे, त्याच्यासाठी वृद्ध माणसे कशी अश्रूचा महापूर ढाळतात, वगैरे यावर हे लोक तासन्तास बोलतात. अगदी ‘टॉक शो’ही ठेवतात. मग हे सगळे झाले की, या नेत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधणारे महाभाग मग एकच आक्रोश करतात. पुड्यावर पुड्या सोडल्या जातात की, लोकांच्या अश्रूच्या महापुरात विरोधकांची सत्ता वाहून जाईल वगैरे वगैरे. पण हे खरे असते का?लोकांची गर्दी तर गल्लीबोळात अतिक्रमण कारवाई बघण्यासाठीही होते आणि मदारीचा खेळ सुरू असतानाही होते. लोकांचे काय, ‘माहेरची साडी’ चित्रपट पाहून रडारड करणारे काय कमी आहेत? काय खरे काय खोटे? पण पब्लीक खूप हुशार आहे हे नक्की!
महिला नेत्यांची भूमिका
 
राष्ट्रवादी पक्षाच्या विद्या चव्हाण, रूपाली चाकणकर, शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे, प्रियांका चतुर्वेदी, दीपाली सय्यद या सगळ्या म्हणे सध्याच्या महिला नेतृत्व आहेत. या महिला नेत्यांचे नेतृत्व म्हणजे काय? तर त्यांच्या पक्षातील पुरुष नेत्याबद्दल काही वाद-चर्चा सुरू झाल्या की, आकांडतांडव करायचा? नेता गुन्हेगार असेल, तर मग. असे छुमंतर व्हायचे की, लोक विसरूनच जातात की, या पक्षात या महिला नेत्या होत्या. यात सर्वपक्षीय महिला नेत्या आल्या, हे विशेष. असो, महिला नेतृत्व म्हणून या सगळ्या जणींचं भांडवल आहे, अद्वातद्वा बोलायचे. मनाला येईल ते वाटेल, ते बरळणं, हे यांच्या नेतृत्वासाठीचे गुण आहेत. माजी महापौर पेडणेकरकाकूंना कोणी तरी विसरू शकेल का? महिलांसाठी राखीव पदे, आरक्षणातील निवडणूक, महिला बाल कल्याण किंवा महिलांसदर्भात काम करणार्‍या समिती आयोग यावरही वर्णी कुणाची तर यापैकीच किंवा अशाच वाचाळवीरांगनांची. या सगळ्या जणींनी आजपर्यत तळागाळातल्या महिलांसाठी काही ठोस भरीव काम केले का?
 
या पार्श्वभूमीवर कालपरवाची घटना आठवली. शीव-माटुंगा रस्त्यावर बस थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले, तर खिडकीबाहेर ती १४ वर्षांची गरोदर पोर, तिच्या चेहर्‍यावरची असाहाय्यता अगदीच भयंकरच. तिच्यापेक्षा वयाने तिप्पट असलेल्या आणि पायाला गँगरिन झालेल्या माणसाला घेऊन ती भीक मागत होती. तो तिचा नवरा होता, असेे ती सांगत होती. आपापल्या पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनार्थ एकदुसरीची उणीदुणी काढणार्‍या महिला नेत्यांच्या परिघात या भीक मागणार्‍या गरोदर असलेल्या १४-१५ वर्षाच्या मुलीच्या भयाण आयुष्याबाबत संवेदना असतील का? काही समाजात आजही विवाहासाठी मुलींना कौमार्यचाचणी द्यावी लागते. वयात आल्यावर आजही मुलींना शाळा सोडून घरी बसवले जाते. संपत्तीत हिस्सा मागेल म्हणून कितीतरी लेकी-सुनांचे नाव रेशनकार्डमध्ये टाकलेही जात नाही. गरीब काय, श्रीमंत घरच्या मुलींनाही व्यसनी बनवून त्यांच्याकडून नको ती कामे करून घेण्याचे षड्यंत्र रचले जाते. कुणाच्या घरची लेक कधी ‘ब्लॅकमेलरां’च्या जाळ्यात सापडेल, याची शाश्वती नाही. महिला सुरक्षा हा तर चिरंतन प्रश्न आहे. आजही हुंड्याचा प्रश्न आहेच. नोकरी करणार्‍या महिलांचे जगणे म्हणजे, घर आणि नोकरी दोन्ही सांभाळा. त्यांचे जगणे त्यांना माहिती. या सगळ्याबाबत सर्वपक्षीय महिला नेतृत्वाची भूमिका काय? काही नाही!
 
 
Powered By Sangraha 9.0