सरकार गेलं आव्हाडांना झाली कळवा खाडीपूलाची आठवण!

23 Jul 2022 18:33:19

thane
 
 
ठाणे : मविआ सरकार कोसळल्याने मंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागलेल्या जितेंद्र आव्हाडाना आता कळवा खाडी पुल खुला करण्यासाठी जाग आली आहे. वाहतूक कोंडीमुळे कळवेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे खाडीवरील तिसरा पूल जेवढा झाला आहे; तेवढा तरी वाहतुकीसाठी खुला करा, अशी मागणी आ.जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
 
 
कळवा खाडीवरील तिसरा सेगमेंटेड पुल अद्याप पूर्ण झालेला नाही. सध्या वाहतुक कोडीने नागरीक हैराण झाले आहेत. कळव्यातील रस्त्यांवर खड्डे नसल्यामुळे अंतर्गत प्रवासासाठी नागरिकांना कुठेही अडचण येत नाही. परंतु, ठाण्यात जाण्यासाठी कळवा पूल ओलांडावा लागत आहे. त्यातच ठाणे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा ताण कळव्यातील वाहतुकीवर पडत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कळव्यामध्ये विशिष्ट वेळेत जड वाहनाना वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
 
 
पण, त्या गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा परिणाम, विद्यार्थी आणि नोकरदारांना सहन करावा लागत आहे. यामध्ये समान्य नागरिकांची काहीच चूक नाही. त्यामुळे कमीत-कमी जो पूल तयार झाला आहे; तो नागरिकांच्या वापरासाठी सुरु करावा, जेणेकरुन थोडीफार वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी आव्हाड यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0