रामनाथ कोविंद : एक राष्ट्रनिष्ठ आणि समाज समर्पित कारकिर्द

23 Jul 2022 21:18:29

kovind
 
 
राष्ट्रपतीपदाची रामनाथ कोविंद यांची कारकिर्द म्हणजे समन्वय, सहभागिता सहकार्य या तत्वांवर आधारित राष्ट्राचा विकास अशीच म्हणावी लागेल. संविधान आणि संस्कार यांच्या प्रेरणेने देशाचा सर्वोच्च नागरिक म्हणून त्यांनी राष्ट्रपतीपदाची धुरा कुशलपणे हाताळली. प्रसिद्धीपासून दूर राहून कोणत्याही वादाचा केंद्रबिंदू न होता, अत्यंत सहज निरलसपणे देशाच्या संविधानात्मक विकासामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याकार्याचा आणि एकंदर व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा...
 
 
बाबासाहेब आंबेडकर समानता जगायचे आणि ‘भवतु सब्ब मंगलम’ म्हणजे सर्वांच्या कल्याणाची कामना करायचे आणि कार्य करायचे. त्यानुसारच आम्ही सगळे काम करतो, हेच आमचे यश आहे.” लखनऊमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर सांस्कृतिक केंद्र ‘आधारशीला’ स्थापनेच्या समारंभामध्ये राष्ट्रती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलेले मनोगत. त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल नुकताच संपुष्टात आला असून आहे, आता नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पदावर विराजमान होतील. अर्थात, सत्ता येते-जाते, आपण केवळ समाजकल्याण आणि देशहिताचे माध्यम आहोत, या विचारांचे रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू हे दोघेही आहेत. त्यामुळे या दोघांचीही ध्येय आणि विचारधारा ठरलेली आहे-
 
 
तेरा वैभव अमर रहे मा
हम दिन चार रहे ना रहे
 
 
तर, रामनाथ कोविंद यांच्या कारकिर्दीत सर्वांत जास्त वादळी निर्णय आणि घटना घडल्या. देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होताना या सगळ्या घटना निरपेक्षपणे आणि हाताळणे म्हणजे महाकठीण काम! पण, आपल्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रपती म्हणून या पदाची गरीमा, प्रतिष्ठा रामनाथ कोविंद यांनी सहज सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीमध्ये रामजन्मभूमीचा मुद्दा होता, त्यांच्याच कारकिर्दीमध्ये नागरी संशोधन कायदाही पारित झाला, त्यांच्या कारकिर्दीतच जम्मू-काश्मीरमधून ‘३७० कलम’ रद्द झाले आणि जम्मू-काश्मीर, लडाखच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला. ‘तिहेरी तलाका’चा मुद्दाही तसाच. त्यांच्या कारकिर्दीमध्येच कृषी कायदे संमत होणे आणि नंतर पुन्हा मागे घेणे या सगळ्या गोष्टी घडल्या.
 
 
हे सगळे मुद्दे आणि कायदे भारतीय समाजासाठी अत्यंत भावनाशील आणि ज्वलनशीलही. या सगळ्या कायद्यांना पारित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे संसदेतील सहकारी, न्यायव्यवस्था अगदी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला या सगळ्यांची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, राष्ट्राचा सर्वोच्च नागरिक म्हणून या सगळ्या मुद्द्यांना कायदेशीर समर्थन देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती ती पंतप्रधानांसोबतच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी. विचार करा या कायद्यांसाठी, मुद्द्यांसाठी पंतप्रधान मोदींनी, त्यांच्या सगळ्या सहकार्‍यांनी या मुद्द्यांसांठी रान पेटवले.
 
 
मात्र, अशावेळी राष्ट्रपतीपदावर हिंसेशिवाय सत्ताप्राप्ती होत नाही किंवा आमची निष्ठा ‘मुस्लीम ब्रदरहुड’शी किंवा आमची निष्ठा रोमन कॅथलिक चर्चशी, त्यांच्या समर्थनाशिवाय आम्ही काहीच निर्णय घेऊ शकत नाही, या विचारांचे राष्ट्रपती असते तर? तर हे सगळे कायदे आणि मुद्दे संमत झाले असते? अर्थात, इथे धार्मिक भेदभाव नाही. पण, मुद्दा राष्ट्रीय प्रेरणेचा आणि विकासाचा आहे. जरा विचार केला तर जाणवते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदावर विराजमान होते म्हणूनच ‘मंदिर वही बनाऐंगे’चे स्वप्न सत्यात उतरवायला किंवा ‘एक देश दो विधान दोन निशान’ हटवण्याचे राष्ट्रीय कर्तव्य प्रत्यक्षात साकारायला किंवा ‘सकल हिंदू बंधू’ या न्यायाने नागरी संशोधन कायदाही अस्तित्वात आणायला सुलभता आली.
 
 
‘हाऊज द जोश’ हे वाक्य खूप प्रसिद्ध आहे. सेनापती, त्याचे सहकारी आणि सर्वच सैन्य एका विचारांनी अभिभूत झाले तरच लढाई जिंकली जाते. तसेच, देशाच्या विकासााठी आणि पुढील जगत्गुरूच्या भूमिकेसाठी देशाच्या सत्ताकारणातल्या प्रत्येक स्थानावर देशकल्याणासाठी सर्वोच्च त्याग करणार्‍या व्यक्ती असणे आवश्यक होते. २०१४ नंतर ते घडले. या सगळ्या प्रक्रियेतूनच रामनाथ कोविंद यांची वर्णी राष्ट्रपतीपदावर लागली हे नक्की. रामनाथ कोविंद कुठच्याही प्रसिद्धीपासून दूर राहिले आणि आपल्यापर्यंत येणार्‍या प्रत्येक कार्याला न्याय देत राहिले.राष्ट्रपती कोविंद यांना भेटण्यासाठी दिवसाला २० लोक यायचे. ज्यामध्ये वैज्ञानिकांपासून अग्निशमन दलाचे कार्यकर्ते ते चतुर्थ श्रेणीचे कामगार अशा सगळ्यांचा समावेश होता. त्यांच्या कार्यकाळामध्ये २०० पेक्षा जास्त केंद्रीय विधेयकांना संमती दिली गेली, तर १५९ राज्य विधेयकांना संमती मिळाली.
 
 
वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी कोणत्याही विधेयकांवर त्यांनी अडचण निर्माण केली नाही. त्यांच्या कार्यकाळात एकूण १३ अध्यादेश जारी झाले, तर ११ राज्यपाल, भारताचे प्रधान न्यायाधीश, मुख्य सूचना अधिकारी तसेच केंद्रीय दक्षता आयुक्तांची नियुक्ती झाली. रामनाथ कोविंद यांनीही देशव्यापी दौरा केला, परदेशातही विशेष समारंभामध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. पण, हे सगळे दौरे आणि प्रतिनिधित्व भारताचा नागरिक म्हणून देशासाठी कसा लाभ होईल यासाठीचेच होते, हे विशेष. त्यांना त्यांच्या परदेशातील समन्वय भूमिकेबद्दल पुरस्कारही मिळाले. गिनी सरकारने त्यांना ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ने सन्मानित केले. तसेच, क्रोशिया देशाने रामनाथ कोविंद यांना ‘ग्रँड ऑर्डर ऑफ किंग तोमिस्लाव विद सैश अ‍ॅण्ड ग्रॅँड स्टार’ या पुरस्काराने सन्मानित केले. त्याचेही कारण हेच की, क्रोशिया आणि भारताचे संबंध स्नेहाचे व्हावेत, यासाठी कोविंद यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
 
 
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचा सर्वोच्च नागरिक म्हणून पदावर असतानाही त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर होते. त्यामुळेच २०२१ साली कर्नाटकातील मंजम्मा जोगाठी या किन्नराने ‘पद्मश्री’ पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी राष्ट्रपती कोविंद यांना आशीर्वाद दिला, तोही पारंपरिक पद्धतीने. कर्नाटकमध्ये हजारो वृक्ष लावणार्‍या १०७ वर्षांच्या सालूमरदा थीमक्का आणि प्रसिद्ध ओडिशा शिक्षाविद नंदा सर यांनीही रामनाथ कोविंद यांना आशीर्वाद दिला. मंजूम्मा असू दे, सालूमरदा असे दे की नंदा सर, ही सगळी या मातीतली असामान्य माणसं. प्रचंड संघर्षातही कोणत्याही पारितोषिकाची अगदी शाबासकीचीही आस न धरता समाजासाठी ध्येयासाठी कार्यरत राहणारी माणसं. या सगळ्या महान लोकांनी राष्ट्रपतींना आशीर्वाद दिले, त्याबदल्यात राष्ट्रपती कोविंद यांनीही आदराने त्यांचा आशीर्वाद सहज स्वीकारला. त्यात कोणतेच नाटक किंवा कृत्रिमता नव्हती. ही स्वभावतली सहज सुलभ नम्रता आणि आदर हीच रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती काळातली श्रीमंती होती.
 
 
त्यांच्या काळात राष्ट्रपती भवनामध्ये प्लास्टिकच्या बाटलीवर बंदी होती. त्यांच्या काळात आसेतू हिमाचल देशभरातील देश आणि समाजासाठी विशेष कार्य करणार्‍या व्यक्तींना आवर्जून आमंत्रित केले गेले. त्यांचा सन्मान केला गेला. इतकेच काय तर राष्ट्रपती भवनातले उद्यान पूर्णपणे बांधले गेले तेव्हा उद्यानामध्ये सगळ्यात आधी प्रवेश देऊन उद्यानाचे उद्घाटन केले ते सेवावस्तीमधील बालक-बालिकांनी. सेवावस्ती ज्याला रूढाअर्थाने ‘झोपडपट्टी’च म्हणतात. सगळ्याच सुविधांचा तिथे वणवा. अशा परिस्थितीमध्ये बालकांच्या व्यथा आणि जीवघेण्या कथा तर शब्दातीत. पण, याच नकळत्या वयात त्यांना जर सुखसमृद्धीची सकारात्मक जाणीव करून दिली, तर हीच बालकं आयुष्यात ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नही करतात.
 
 
राष्ट्रपती कोविंद यांनी सेवावस्तीतील बालकांना राष्ट्रपती भवनामध्ये बोलावून त्यांच्याशी संवाद करून हेच साध्य केले. लष्करात परिचारिका म्हणून कार्यरत असणार्‍या भगिनींच्या हस्ते राखी बांधून घेणे असू दे की, अंगणवाडी सेविकांशी संवाद असू दे, राष्ट्रपती कोविंद यांनी नेहमीच समाजसमरसतेचा नवा अध्याय मांडला. संविधान आणि संस्कार यांना सोबत घेऊन जगणारे रामनाथ कोविंद अतिशय संवेदनशील आहेत. २०१८ साली गणतंत्र दिनी हुतात्मा गरूड कमांडो जेपी निराला यांना मृत्यूपश्चात ‘अशोकचक्र’ प्राप्त झाले. हा सन्मान स्वीकारण्यासाठी निराला यांची पत्नी आणि वयोवृद्ध आई व्यासपीठावर आल्या. या वीरमाता आणि वीरपत्नीला पाहून राष्ट्रपती कोविंद यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. हे अश्रू त्या वीराचा सर्वोच्च सन्मान होता, या वीरमाता आणि वीरपत्नीचा सर्वोच्च आदरच होता.
 
 
उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य नव्हे, गरीब कुटुंबातून, त्यातही कोळी समाजातून आलेले रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ हा भारतीय महिलाशक्तीसाठी सदैव स्मरणातच राहील. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दोन नराधामांचे दया अर्ज फेटाळले. त्यातला एक अर्ज करणारा होता ज्याने आईसकट बालकांना जीवंत जाळले होते आणि दुसरा होता ‘निर्भया’ बलात्कार आणि मृत्यूकांडातला राक्षसी गुन्हेगार. राष्ट्रपतींनी क्षणाचाही विलंब न करता या गुन्हेगारांचे अर्ज फेटाळले. हे अर्ज फेटाळताना या गुन्हेगारांना जगण्याचा अवधी मिळेल, याची पुसटशीही आशा राष्ट्रपतींनी ठेवली नाही.
 
 
मातृशक्तीच्या सुखदु:खाशी रामनाथ कोविंद यांची नाळ जुळलेली. वीरपुत्र गमावलेल्या मातेला पाहून डोळ्यात अश्रू येणे किंवा मुलीबाळींवर अत्याचार करणार्‍यांविरोधात कडक पाऊल उचलण्याची वृत्ती रामनाथ कोविंद यांच्यामध्ये होती आणि आहे. कारण, रामनाथ कोविंद यांनी वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या आईला गमावले. ती घटना रामनाथ कोविंद यांच्या मनावर कायमच कोरली गेली, यात शंकाच नाही. रामनाथ कोविंद यांचे घर म्हणजे झोपडीच. गावातल्या या वस्तीला आग लागली. त्यात रामनाथ यांच्या घराचे गवती कौलही धुँ..धुँ म्हणत पेटू लागले. त्यावेळी त्यांची आई कलावती चुलीवर भाकरी बनवत होती. कलावतींच्या लक्षात आले की, कौलं पेटली, आजूबाजूची घरही पेटली. कौलं जळून पडणार म्हणून घरातले शेवटचे सामान बाहेर काढत ती कशीबशी बाहेर आली. तिच्या लक्षात आले की सर्वजण तर बाहेर आहेत. पण, लहानगा रामनाथ कुठे आहे? मग काय जीवाची पर्वा न करता, कलावती झोपडीत जाऊ लागल्या. लोकांनी त्यांना अडवले तरी त्या कौलं पेटत असलेल्या झोपडीत शिरल्या. छोटे रामनाथ भिंतीच्या कोपर्‍यात अर्धवट झोपेत दिसले. त्यांनी रामनाथ यांना उचलले आणि त्या वायुवेगाने घराच्या बाहेर आल्या. पण, पेटती कौलं, भिंती त्यांच्या अंगावर कोसळले. अशाही परिस्थितीमध्ये जीवाची पर्वा न करता कलावती यांनी चपळाईने रामनाथ यांना रस्त्यावर फेकले. रामनाथ वाचले खरे, पण कलावती यांना आगीने घेरले आणि त्यातच त्यांचा जागीच भयानक मृत्यू झाला. लेकराला वाचवताना आईची राख झाली. हे सगळे रामनाथ यांनी नकळत्या वयात पाहिले. लिहितानाही आता डोळ्यात अश्रू आहेत, तर आईची, स्त्रीशक्तीची महती त्यांना नाही कळणार तर कुणाला कळणार? त्या दुःखाने त्यांच्यातली बालसुलभ चंचलता लोप पावून अतिसंवेदनशीलतेची किनार असलेले गांभीर्य त्यांच्यात आले.
 
 
असो. देशाच्या, समाजाच्या एकतेसाठी अपमानाचे हलाहल प्यायचे असतात, हे त्यांच्या स्वभावातच. त्यामुळेच ओडिशाच्या जगन्नाथ मंदिरामध्ये त्यांना आणि त्यांच्या पत्नी सविता यांना प्रवेश देण्याआधी अडवण्यात आले, असे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. मात्र, या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रपती कोविंद यांनी समन्वयाची भूमिका घेतली. सामाजिक समरसतेचा अश्वमेध अडू नये, म्हणून ही घटना अतिशय समन्वयाने हाताळली. त्यांचा अपमान झाला. पण, या विरोधात त्यांनी कुणालाही सजा दिली नाही किंवा समाजात दुजाभाव करणार्‍यांना संधी मिळेल, असे काहीएक होऊ दिले नाही. त्यानंतर दुसर्‍याच वर्षी ते पुन्हा जगन्नाथ मंदिरामध्ये सपत्नीक आशीर्वादासाठी गेले आणि त्यांनी विधीवत यथासांग पूजाही केली. भारताच्या सर्वोच्चपदी राहून समरस समाजासाठी जगणारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समरस आणि नि:स्पृह राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळाला भारतीय विसरू शकणार नाहीत.
 
 
Powered By Sangraha 9.0