मुंबई : वर्ष 2020 साठीच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज दिल्लीत करण्यात आली. फिचर आणि नॉन फिचर चित्रपट विभागातील विजेत्या चित्रपटांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. हिंदी फिचर फिल्म विभागामध्ये ‘तान्हाजी’ या चित्रपटाला समग्र मनोरंजन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याच चित्रपटासाठी ‘अजय देवगण’ यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट वेशभूषे’चा देखील पुरस्कार पटकाविला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून ‘आशुतोष गोवारीकर निर्मिती’ संस्थेच्या ‘तुलसीदास ज्युनियर’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे.
मराठी चित्रपटांच्या विभागात ‘अमोल गोळे’, दिग्दर्शित ‘सुमी’ या चित्रपटाला सर्वोकृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला असून याच चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकारांचा’ पुरस्कार ‘आकांक्षा पिंगळे’ आणि ‘दिव्येश इंदुलकर’ यांना जाहीर झाला आहे. ‘विवेक दुबे’ दिग्दर्शित 'फ्युनरल' या चित्रपटाला सामाजिक समस्येवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर 'गोष्ट एका पैठणीची' या शंतनू रोडे दिग्दर्शित, चित्रपटाला ‘सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा रौप्य कमळ पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
'मी वसंतराव' या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे तर याच चित्रपटासाठी ध्वनी संयोजक अनमोल भावे यांना फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम ध्वनी संयोजनाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. फिचर फिल्म विभागात परीक्षकांतर्फे विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून 'अवांछित' आणि 'गोदाकाठ' या दोन मराठी चित्रपटांची नावे जाहीर झाली असून अभिनेता किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार घोषित झाला आहे. 'जून' या चित्रपटासाठी अभिनेता सिद्धार्थ मेनन यांना विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला आहे.
नॉन फिचर चित्रपटांच्या विभागात मराठी भाषेतील ‘कुंकुमार्चन’ या नॉन-फिचर फिल्म श्रेणीतील चित्रपटाला कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे तर पदार्पणातील विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून पुण्याच्या एमआयटी संस्था निर्मित ‘परिह’ या चित्रपटाचे नाव जाहीर झाले आहे. फिल्म्स डिव्हिजनच्या ‘पाबुंग स्याम’ या हाओबाम पबन कुमार दिग्दर्शित मणिपुरी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट साहसी चित्रपटाचा पुरस्कार फिल्म्स डिव्हिजनतर्फे निर्मित 'व्हिलिंग द बॉल' या चित्रपटाला जाहीर झाला आहे.