अनंत मरणे झेलणारी भंडाऱ्याची संघर्षकन्या

22 Jul 2022 20:50:37

Sangharshakanya
 
 
‘शाळा सोडून जा, नाहीतर तुला मारून टाकू,` अशा धमक्यांना फाट्यावर मारत शिक्षणाचे सेवाकार्य अविरतपणे सुरू ठेवणाऱ्या भंडाऱ्यातील विद्यार्थीप्रिय शिक्षिका स्मिता विनोद गालफाडे यांच्याविषयी...
 
 
आई कविता करून त्यांना चाली लावत, तर वडील अच्युतराव देशमुख प्रशासकीय अधिकारी असूनही त्यांना संगीताची आवड होती. त्यामुळेच नांदेड शहरात जन्मलेल्या स्मिता यांच्या गळ्यातील स्वर त्यांनी ओळखला आणि जपला. देगलूरच्या मानव विकास विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शाळेत गणेशोत्सवात त्या दररोज ३५ ते ४० गाणी एकट्याच गात. त्यामुळे त्यांची गावामध्ये लता मंगेशकरांची दुसरी कॉपी म्हणजेच ‘मता मंगेशकर` म्हणून ओळख झाली. पुढे, त्यांनी देगलूर महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हा त्यांच्यामुळेच बाबुराव उप्पलवार यांच्या प्रयत्नातून देगलूर महाविद्यालयामध्ये बारावीपर्यंत संगीत विषयाला मान्यता मिळाली. औरंगाबाद बोर्डातून बारावीत संगीत विषयात त्या प्रथम आल्या. नंतर त्यांनी यशवंत महाविद्यालयातून संगीतात ‘बीए` करत अनेक राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळवले. विशेष म्हणजे, प्रवेशिकेपासून ते विशारदपर्यंतचा प्रवासही त्यांनी शिक्षणासोबतच पूर्ण केला. ‘एम.ए`साठी संगीत विषय नसल्याने त्यांनी ‘एम.ए मराठी`साठी प्रवेश घेतला. पुढे एक वर्षांतच शिवाजी विद्यालयात त्या संगीत शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. मात्र, विनोद गालफाडे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्या नागपूरला स्थायिक झाल्या.
 
 
१९९३ साली मॉरीस महाविद्यालयात ‘एम.ए संगीत`साठी प्रवेश घेतला. १९९५ साली पुन्हा अर्धवट राहिलेले ‘एम.ए मराठी`चे शिक्षण पूर्ण केले. रियाझ चालू असेल, तर गाणं चालू राहतं, त्यामुळे त्यांनी गाण्यांचे क्लासेस घेण्यास सुरुवात केली. तीन वर्षांनंतर त्यांची मंडळाकडून नोकरीसाठी निवड झाली खरी. पण, दोन वर्ष नियुक्तीच मिळाली नाही. त्यावेळी पती विनोद यांनी अनेक लोकप्रतिनिधींची भेट घेतली. अखेर दोन वर्षांच्या संघर्षानंतर त्या भंडारा जि. प. हायस्कूल सानगडी येथे संगीत शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. मुलगा लहान असल्याने त्या नागपूरहून जाऊन-येऊन नोकरी करत. पण, नंतर ते शक्य नसल्याने सानगडीत त्या भाड्याच्या खोलीत राहू लागल्या. एकदा प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी स्वयंस्फूर्तीने सरस्वती स्तवन म्हटलं. त्यानंतर त्यांचे गायन पाहून २००२ साली त्यांची भंडाऱ्यातील मंड्रो हायस्कूलमध्ये बदली झाली. पतीची नोकरी गेल्यानंतर त्या कुटुंबीयांसोबतच भंडाऱ्यात स्थायिक झाल्या. त्या बालभारतीच्या अभ्यास मंडळावरही आहेत. कवितांचे अल्बमही प्रकाशित झाले. सहावी ते आठवीच्या कवितांना त्यांनी बालचित्रवाणीद्वारे स्वरबद्ध केले. २०१२ नंतर त्यांना आसगावच्या शाळेत बढती मिळाली. याठिकाणी त्या मराठी शिकवू लागल्या. त्यांनी ‘गुंजन ग्रुप` स्थापन करून अनेक गाण्यांचे कार्यक्रम केले.
 
 
‘जागर बोलीचा, आदर मराठी`चा हा मंच स्थापन करून त्या दरवर्षी १२ हस्तलिखिते काढतात. २०१२ नंतरच्या संघर्षात त्यांचा जीवही गेला असता. आजूबाजूला टोळक्यांचा उच्छाद सुरू झाला. गावातील ग्रामस्थांच्या आग्रहाखातर त्यांनी गावातील मुलांच्या आवाजात राष्ट्रगीताची ‘सीडी` काढली. स्मिता यांची प्रसिद्धी वाढत गेली. मात्र, ती त्यांनाच मारक ठरली. सप्टेंबर २०१२ पासून त्यांना अनोळखी माणसांकडून रात्री अपरात्री अश्लिल मेसेज, धमक्या, फेक कॉल्स सुरू झाले. मात्र, कुटुंबीय त्यांच्या पाठीशी उभे राहिले. शिक्षकाने अन्याय सहन केला, तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर शाळेतीलच एका मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याने स्मिता पुरत्या हादरल्या. त्यानंतर त्यांना नोकरी सोडून जाण्यासाठी धमक्या सुरू झाल्या. ‘तुमच्यासोबत मंचावर काम करणाऱ्या दोन-तीन मुलींनाही संपवून टाकू,` अशा धमक्या फेक अकाऊंटवरून आल्या. पुन्हा तक्रार केल्यानंतर तपासात माजी विद्यार्थ्यांना पकडलं गेलं. सदर विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांनी ती केस मागे घेतली. स्मिता यांच्या निडरतेमुळे त्यांना पुन्हा एका शिक्षकाकडून त्रास सुरू झाला. त्यांच्यासोबत मंचावर काम करणाऱ्या मुलांनाही त्रास सुरू झाला. बाहेरही बदनामी सुरू झाली.
 
 
एवढ्यातही त्यांनी कर्करोग शिबिरासह अनेक सामाजिक उपक्रम राबवले. काही पालकांनी मुलींची शाळेतून नावे काढून घेतली. याचदरम्यान, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सक्षम समितीवर नेमलं. त्यावर त्यांनी स्वतःच अन्यायग्रस्त असल्याचे सांगितले. अखेर प्रशासनाच्या चौकशीनंतर संबंधिताला निलंबित केलं गेलं. त्यानंतर उलट त्यांच्यामागे माहितीच्या अधिकारांचा समेसिरा लागला. दारू पिऊन लोकांना स्मिता यांच्याविरूद्ध भडकवलं गेलं. निलंबनानंतर सदर प्रकरण न्यायालयात सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडे बदलीची विनंती केल्यानंतर स्मिता यांची बदली करण्यात आली. ‘राज्य शिक्षक पुरस्कार`ही त्यांना मिळाला आहे. कितीही अडचणी आल्या तरी माझा ज्योतिबा सोबत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उचलेले पाऊल योग्य असल्याचे स्मिता सांगतात. सध्या त्या जिल्हा मराठी भाषा समितीवर कार्यरत आहे. ‘अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी,` हा मंत्र ध्यानी ठेवून वाटचाल करणाऱ्या स्मिता विनोद गालफाडे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत`तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
७०५८५८९७६७
 
 
 
Powered By Sangraha 9.0