नवी दिल्ली: भारत १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करतो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांमध्ये राष्ट्रध्वज फडकवून 'हर घर तिरंगा' मोहिमेला बळ देण्याचे आवाहन भारतीयांना केले आहे. या मोहिमेमुळे तिरंग्यासोबतचे आमचे नाते अधिक दृढ होईल, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.
२२ जुलै १९४७ रोजी तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. "आम्ही वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढत असताना स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वांचे धैर्य आणि प्रयत्न आज आम्हाला आठवत आहेत. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो." असे मोदी ट्विटरद्वारे म्हणाले.भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याचे छायाचित्रही मोदींनी ट्विट केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील देशवासियांना १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "या मोहिमेअंतर्गत देशभरातील सुमारे २० कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल, जो प्रत्येक नागरिकाच्या, विशेषत: तरुणांच्या मनात देशभक्तीची अखंड ज्योत अधिक प्रज्वलित करण्याचे काम करेल."
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी देखील ट्विट करून परदेशात राहणाऱ्या भारतीयांना १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा चळवळी'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.