मुंबई : गेले काही वर्ष तंत्रज्ञानाबरोबरच नाटकाच्या कथेपासून सादरीकरणापर्यंत अनेक बदल होत आहेत. त्यातीलच 'संगीत देवबाभळी' हे एक नाटक आहे. या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर आपले स्वतंत्र नाव केले आहे. 'संगीत देवबाभळी'ने नाट्यस्पर्धांमध्ये तर कैक बक्षीसे मिळवली आहेत परंतु नुकताच या नाटकाला 'साहित्य अकादमी'चा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याच्या घवघवीत यशानंतर आता आणखी एक कौतुकास्पद बाब समोर येत आहे ती म्हणजे, संगीत देवबाभळी हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या 'बीए' अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.
२२ डिसेंबर २०१७ मध्ये हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले. या आधी हे नाटक महाविद्यालयीन एकांकिका मध्ये सादर झाले होते. परंतु, व्यावसायिक रंगभूमीवर आल्यानंतर या नाटकाची ओळख सातासमुद्रापार गेली. अर्थातच याचे किमयागार आहेत नाटकाचे लेखक - दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांची. कमी वयातच त्याच्या नाटकाने अनेक विक्रम केले. प्रसाद कांबळी यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.
२०१८ मध्ये 'संगीत देवबाभळी'ने सर्वाधिक पुरस्कार मिळाले तर आजवरच्या नाटकाच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढत या नाटकाने ४२ पुरस्कार मिळवले आहे. अत्यंत वेगळा विषय आणि वास्तवासोबत अध्यात्माची घातलेली अनोखी सांगड यामुळे हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या बीए मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेले 'संगीत देवबाभळी' हे पुस्तक आता २०२२ पासून बीए मराठी प्रथम वर्षासाठी हे पुस्तक अभ्यासक्रमाला असेल.
प्राजक्त देशमुख यांनी 'भंडाऱ्याच्या डोंगरावर संत तुकोबांना भाकरी द्यायला गेलेली नि काटा रूतून बेशुद्ध झालेली आवली आणि तिला लखुबाई बनून घरी घेऊन येणारी साक्षात रखुमाई यांच्यातील अनोख्या संवादातून लौकिक अलौकिक नात्याची वीण या नाटकात रेखाटली आहे. देवत्व लाभलेल्या रखुमाईला आवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान आणि संसारी आवलीच्या साध्या प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. या नाटकात अभिनेत्री मानसी जोशी हिने राखुमाईची तर अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने आवलीची भूमिका साकारली आहे. विजया मेहता यांच्यापासून नसिरुद्दीन शाह, परेश रावल, दिलीप प्रभावळकर अशा अनेक दिग्गजांनी या नाटकाचे कौतुक आहे.