वरळी आगाराच्या जागेची खासगी कंपनीकडून पाहणी?

21 Jul 2022 17:34:53
Worli depot
मुंबई : वरळीच्या ‘बेस्ट’ आगारातील जागेची खासगी कंपनीच्या कर्मचारी आणि संबंधित अधिकार्‍यांनी पाहणी केली असून त्या जागेवर इलेक्ट्रिक बसेसचे ‘चार्जिंग पॉईंट्स’ बसवण्यात येणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेसची पार्किंग आणि दुरुस्तीच्या नावावर डेपोची जागा बळकावण्याचे प्रयत्न तर सुरू नाहीत ना, अशी भीती वरळी आगारातील ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांनी व्यक्त केली आहे.
 
 
जागा खासगी कंपनीच्या ताब्यात देण्याचे षड्यंत्र
वरळी आगारातील अभियांत्रिकी विभागातील जागेच्या पाहणीसाठी एका खासगी कंपनीच्या लोकांचे पथक नुकतेच दाखल झाले होते. त्याबाबत चौकशी केली असता त्या जागेत त्या कंपनीच्या सुमारे ५० डबलडेकर बसेससाठी पार्किंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर जागेवर ‘चार्जिंग इलेक्ट्रिकल पॉईंट्स’ नव्याने बसवणार आहेत. अशाच प्रकारचे इलेक्ट्रिकल पॉईंट्स वरळी आगारातील परिवहन विभागातील जागेत याअगोदर बसविले असल्यामुळे तेथील जागेवर नव्याने आलेल्या साधारण ६०-७० बसेस दररोज पार्किंग होतच आहेत. ज्या खासगी बसेसची दुरूस्ती करण्यासाठी अभियांत्रिकी विभागातील जागेचा वापर गेल्या सहा-सात महिन्यांपासून होतच आहे. आता हे नव्याने दिलेले दुसर्‍या कंपनीचे कंत्राट असून त्यांच्या डबलडेकर बसेस येणार आहेत.
 
 
अभियांत्रिकी विभागातील सर्व अंतर्गत दुरूस्ती खात्याच्या जागेत नवीन कंपनीचे कर्मचारी काम करण्यासाठी येणार असल्यामुळे सध्या आगारात काम करणार्‍या कामगारांची अडचण होणार आहे. यातून मुंबईतील ‘बेस्ट’ आगाराच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एका जागेचा ताबा खासगी कंपनीकडे देण्याचे षड्यंत्र सुरू आहे,” असा गंभीर आरोप भाजपच्या ‘बेस्ट’ कामगार संघाचे सचिव दीपक सावंत यांनी केला आहे.
 
Powered By Sangraha 9.0