सुरक्षादलांची मोठी कारवाई; ७ दहशतवाद्यांना अटक

20 Jul 2022 14:29:37

toyaba
 
 
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी सीमेपलीकडून सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तीन ‘दहशतवादी नेटवर्क’चा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात दहशतवाद्यांना अटक केली आहे. जम्मू विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले की, “राजौरी येथून दोन ‘मॉड्यूल्स’चा भांडाफोड करण्यात आला आहे. याअंतर्गत ‘लष्कर-ए-तोयबा’च्या पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर जम्मू विभागातून एका ‘मॉड्यूल’ची भांडाफोड करण्यात आला आहे. येथून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
 
 
अटकेवेळी दहशतवाद्यांकडून दोन ‘एके-४७’ रायफल, सहा पिस्तुल्स, तीन सायलेन्सर, आठ ग्रेनेड, तीन युबीजीएल, सहा पिस्तुल्स मॅगझीन, सहा ‘एके’ रायफल, १२० काडतुसे यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी सांगितले की, जम्मूतील ‘लष्कर-ए-तोयबा’चे ‘मॉड्यूल’ खाटिका तालाब भागात दोन वर्षांपासून सक्रिय होते. त्याचे संचालन फैसल मुनीर याने केले. मुनीरला सध्या पाकिस्तानात असलेला ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी बशीर डोडा याने सूचना दिल्या होत्या, तर दुसर्‍या दहशतवाद्याचे सांकेतिक नाव अल्बर्ट होते.
 
 
पोलिसांनी सांगितले की, हे ‘मॉड्यूल’ पाकिस्तानमधून ‘ड्रोन’द्वारे टाकली जाणारी शस्त्रे आणि स्फोटके गोळा करत होते. या ‘मॉड्यूल्स’चा भांडाफोड केल्यानंतर जम्मूतील बहुतांश दहशतवाद प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. सिंह म्हणाले की, “या कारवाईमुळे जम्मूमधील लष्कराला मोठा धक्का बसला आहे.”
 
 
 
Powered By Sangraha 9.0