मुंबई: “मुंबईच्या मेट्रोला, आरे कारशेडला विरोध करणार्यांमुळे मुंबईची मेट्रो रखडली आहे. आता या विरोधकांनी आरे कारशेड म्हणजेच ६० हजार कोटींचा घोटाळा असा आरोप केला आहे, हा एक स्टंटच आहे. मेट्रो थांबवावी, कारशेडचे काम होऊ न देणे म्हणजेच मुंबईच्या विकासाची वाट लावणे, असा हेतू आहे का? हे कोणाचे हस्तक आहेत,” असा सवाल भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केला आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमय्या म्हणाले की, “६० हजार कोटींचा आरे कारशेड घोटाळा म्हणणार्यांनी ६० पैशांच्या घोटाळ्याचेही पुरावे दिलेले नाहीत. हे एजंट कोणाचे आहेत? पर्यावरणवादी आहेत की मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास होऊ नये, मेट्रो पुन्हा रुळावर येऊ नये, हा यांचा हट्ट आहे. स्वतःला पर्यावरणवादी म्हणवणारे ४ हजार, ८०० कोटींच्या ‘रॉयल पाम’ची जागा घ्या, असे राज्याला सुचवतात. आरे कारशेडला ’जी-३०’ हेक्टर जागा वापरली जाणार आहे, त्याचा निर्णय ३ मार्च, २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने घेतला आहे. आरेमध्ये कारशेड करावे, याला मान्यता १८ जुलै, २०१३ मध्ये मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाने दिली होती आणि आता आरोप शिंदे आणि फडणवीस यांच्यावर केले जात आहेत.”
पुढे ते म्हणाले की, “फक्त ३० हेक्टर जागा लागणार आहे. एक दमडीचे ’कमर्शियलायझेशन’ होणार नाही. व्यावसायिक वापराचा निर्णय तर पृथ्वीराज चव्हाण यांचा होता. तोही २०१७ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी बदलला आहे. त्यामुळे 60 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करणार्यांकडे दमडीचाही पुरावा नाही. हे कोणाचे हस्तक आहेत, हे फडणवीस-शिंदे सरकारने शोधायला हवे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मी तशी मागणी केली आहे. आरे कारशेडचे काम तत्काळ सुरु करा. दीड वर्षात मेट्रो चालू करा, अशी मागणीही यावेळी सोमय्या यांनी केली.