म्हाडाला वांद्रयात मिळाला ३०० कोटींचा भूखंड

20 Jul 2022 21:24:59
 
mhada
 
 
 
मुंबई : वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या मुंबई मंडळाचा मालकीचा जी-९ हा प्राईम लोकेशनला असलेल्या भूखंडाबाबत म्हाडा अनभिज्ञ होते. सदर भूखंडाचा कथित बिल्डराने बेकायदा ताबा घेऊन लोखंडी पत्र्याचे कंपाऊंड बांधून अतिक्रमण केल्याची तक्रार म्हाडाला स्थानिकांकडून प्राप्त झाल्याने या भूखंडाचा ताबा पुन्हा म्हाडाने घेतला आहे.
 
 
 
वांद्रे पूर्व रेल्वेस्थानकाजवळील अनंत काणेंकर मार्गावरील एचडीआयएल इमारतींसमोरील नभूक्र ६०८(पार्ट) ६६८, जी-९ अंदाजे तीनशे कोटीचा भूखंड एका बिल्डराने गेल्या १५ वर्षांपासून बळकावून आपल्या ताब्यात ठेवला होता. याची तक्रार माजी खासदार हुसेन दलवाई यांनी स्थानिकांनी केल्याल्या तक्रार अर्जावरून दलवाईं यांनी मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड म्हाडाने आपल्या ताब्यात घेऊन त्यावर गरिबांसाठी घरे बांधावीत यासाठी म्हाडाकडे पाठपुरावा सुरु केला होता.
 
 
 
नुकताच मुंबई मंडळाच्या वांद्रे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन भूखंडावरील बिल्डरांचे अनधिकुत अतिक्रमण हटवून हा भूखंड आपल्या ताब्यात घेतला. या ठिकाणी म्हाडाचे फलक लावले असून या भूखंडावर परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
 
Powered By Sangraha 9.0