कमांडर (नि.) प्रा. डॉ. सुनील कांबळे (पीपल्स एज्युकेशन सोसायटी) सिध्दार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य )यांना ‘पी. ए. सोसायटी’च्या ७७व्या वर्धापन दिनी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा पुरस्कार’ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते शुक्रवार, दि. ८ जुलै रोजी प्रदान करण्यात आला. कमांडर(नि.) उपप्राचार्य सुनील यांचा सत्कार हा जणू डोंबिवलीकरांचाच सत्कार झाला, असे मानून डोंबिवलीतील विविध संस्थांनी एकत्र येऊन सरांचा एक छोटेखानी सत्कार रविवार, दि. १७ जुलै रोजी ‘कानविंदे क्रीडा भवना’त आयोजित केला होता. डोंबिवलीतील वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक हभप महंत बाळकृष्ण महाराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराजांनी मार्गदर्शन करताना संतांची समरसता मांडली आणि त्या दिशेने उपप्राचार्य डॉ. सुनील कांबळे यांनी ३५ वर्षे समाजातील उपेक्षित वर्गात तसेच दुर्लक्षित घटकांत केलेल्या कामांचा उल्लेख केला. “आज डोंबिवलीकरांना अभिमान वाटावा, असा कांबळे यांचा सन्मान झाला,” असे सांगीतले.
डॉ. सुनील कांबळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ”खरोखर विविध कामे उभारताना अनंत अडचणी, विरोध, अपमान तसेच मान-सन्मानही वाट्याला आले. पण, हेतू सात्त्विक, शुद्ध असल्याने ते सर्व सहन करण्याची शक्ती मला परमेश्वराने दिली. लहानपणापासून रा. स्व. संघाचे अनेक कार्यकर्ते आणि त्यांच्या घरातील मातृशक्तीने मला समाजाभिमुख होण्याची दृष्टी दिली.” संरक्षणदलांमध्ये भरतीसाठी केलेल्या कामातील अनुभवही सांगितले. वारांगनांच्या मुलांसाठीचे काम, ज्येष्ठाश्रमांतील तरुणाईच्या दिवाळीची सुरुवात, हुतात्मा कॅ. सचान यांच्या स्मृतिस्थळावरील प्रतिवर्षीची मानवंदना आदी उपक्रमांबरोबरच तरुणांना संरक्षणदलांमध्ये भरती होण्यासाठी केलेले मार्गदर्शन आणि यशस्वी झालेले उमेदवार यांच्याबद्दलही माहिती दिली. आजही तरुणांना सैन्यदलामध्ये भरतीच्या वेळी कांबळे सर मार्गदर्शन करतात. त्या सर्व गोष्टींची समाजाने नोंद घेऊन हा माझा सत्कार केला आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या पत्नी अलका कांबळे याही आवर्जून उपस्थित होत्या. त्यांचाही सत्कार इतिहास संकलन समितीच्या जिल्हा कार्यवाह सुखदा रावदेव यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ‘संस्कृत भारती’चे रविंद्र खाडीलकर यांनी संकल्प सांगून केली.
प्रास्ताविक ‘इतिहास संकलन समिती’चे प्रांत सचिव चंद्रकांत जोशी यांनी केले. रा.स्व.संघाचे कल्याण भागाचे सहकार्यवाह निंबाळकर हजर होते, तर ‘क्रीडा भारती’चे पंकज येवले, विनोद बेंद्रे, नंदूजी रानडे यांनी सत्कार सोहळ्याचे नेटके आयोजन केले. प्रशांत रावदेव इतिहास संकलन समितीचे कोकण प्रांत सहसचिव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत चांगला झाला.
- सुखदा रावदेव