माणसाला आपल्या आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात काम करताना एक महत्त्वपूर्ण पाया रोवावा लागतो, जो भक्कम आहे, ज्याच्यात चिरस्थायी स्थिरता प्रदान करण्याची क्षमता आहे, मग जगात काहीही बदल घडले तरी चालेल. याशिवाय आपल्या निर्णय आणि कृतीसाठी जबाबदार असणे म्हणजे विश्वासार्हता. आपली चूक आपण स्वीकारणे आणि ती सुधारण्यासाठी विनम्रतेने प्रयत्न करणे, जेव्हा खात्री नसते, तेव्हा आपल्यावर अवलंबून असणार्या माणसांना सांगणे हे यशस्वी माणसाच्या यशाचा भाग आहे.
यशापेक्षाही विश्वासार्हतेचा बार अधिक उच्च दर्जाचा आहे. अशा व्यक्तीकडे लोक निर्णय घेण्याबरोबर एक विश्वासार्ह संसाधन म्हणून पाहतात. ते तुमच्यावर अवलंबून राहू शकतात. तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात. तुमच्याबरोबर करार वा व्यवसाय करू शकतात आणि मुख्य म्हणजे, तुमच्यावर जुळवून घेऊ शकतात. जेव्हा आपण लोकांना पहिल्यांदा भेटतो, तेव्हा त्या प्रथम परिचयात एक प्रश्न आपल्या व त्यांच्या मनात सहज येतो. तो म्हणजे, आपण या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकतो का? हे व्यक्तिगत भेटीतच नाही, तर व्यावसायिक भेटीतसुद्धा घडत असत. कामाच्या ठिकाणीसुद्धा आपण एखाद्याने दिलेल्या माहितीवर कितपत अवलंबून राहू शकतो किंवा त्यांना विश्वासाने किती माहिती देऊ शकतो, हे प्रश्न सगळ्यांच्याच मनात येत असतात. त्यासाठीच एक महत्त्वाचा प्रश्न असतो की, ती विश्वासार्हता कशी विकसित करायची?
आपली विश्वासार्हता परिणामकारकरित्या कशी प्रस्थापित करायची, हा विचार आज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचा ठरतो. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आपल्याशी बालपणापासून जोडले गेलेले आपले शिक्षक, आपले शेजारीपाजारी, आपले जवळचे नातेवाईक, आपल्या पालकांचे दोस्त व सहकारी हे सामाजिक वर्तुळ आपल्याभोवती वर्षानुवर्षे संवाद साधून होते. त्यामुळे ती नाती ही अधिक प्रेमाची आणि एकमेकांना सहज सामावून घेणारी असतात. त्यात स्नेहाचा अंतर्भाव अधिक असतो, पण नंतरच्या व्यावसायिक आयुष्यात आपली कार्यस्थळे व सामाजिक समुदाय वैविध्यपूर्ण आहे, विस्तारता आहे आणि बदलत राहणारा आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या मोठ्या दबावाखाली राहत असताना केवळ व्यक्तिगत पातळीवर नाही, तर सामाजिक, राजकीय पातळीवर विश्वासार्हता निर्माण करण्याचे आव्हान प्रत्येकाच्या समोर असते. दोन व्यक्तींमधला विश्वास हा पुढे संस्था वा समाज व देश या सर्वांचा पाया असतो. एकंदरीत या सर्वांमधील नात्यात विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा असतो.
कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जिथे महत्त्वाच्या निर्णयासाठी लोकांना नियुक्त करणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक असते, अशा ठिकाणी लोकांना आपल्या यशाचा अनुभव आणि आपल्या कौशल्याचा स्वाभाविक पुरावा देणे आवश्यक ठरते. अशावेळी अनेक लोकांना ते दाखविण्याची लाज वाटते. त्यांना वाटते, त्यांचे प्रामाणिक कष्ट आणि यश स्वत:च बोलके उदाहरण आहे. ते त्या कामाच्या ठिकाणी खरेतर सर्वात हुशार व्यक्ती असूनही पुढे-पुढे करणार्या व्यक्तींच्या मागे राहतात. पुढे निराश होतात. एक लक्षात घ्या, तुम्ही स्वतःचे मूल्य जपणे आणि तुमच्या संस्थेला ते प्रामाणिकपणे कळू देणे, हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. आपल्यातील कौशल्य इतरांना कळू द्यावे, त्यात नकारात्मक काहीच नाही. उलट तुमची विश्वासार्हता काही अंशी वाढू शकेल. यात महत्त्वाचे हे आहे की, तुम्ही तुमच्या कौशल्याचा उपयोग इतरांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी कसा करू शकता, यावर तुम्ही किती लक्ष दिले आहे, यात मीपणा कमी असतो आणि इतरांना देण्याची प्रवृत्ती अधिक असते.
तुमची विश्वासार्हता मिळवण्याची क्षमता तुम्ही इतरांच्या गरजा किती चांगल्या प्रकारे सांभाळता, तुम्ही परानुभूती कशी दाखवता, यावर अवलंबून असते. जेव्हा लोकांना तुम्ही किती खरे आहात हे पटते, तुमच्यामधील चांगल्या हेतूची जाणीव होते, तेव्हा ते तुमच्यावर विश्वास ठेवतात.‘कॉर्पोरेट’ जगात रतन टाटांविषयी विश्वासार्हतेचा असा दरारा आपल्याला दिसून येतो. मग त्याचे उत्पादन हे दर्जेदार असणारच, हे सर्वमान्य असते. व्यक्ती म्हणूनही रतन टाटा वा ‘विप्रो’चे अजीम प्रेमजी यांच्याबद्दलची विश्वासार्हता अत्यंत श्रीमंत असणार्या इतर उद्योजकांना लाभल्याचे ऐकिवात नाही. यांचे मूळ कारण व्यवसायाच्या दुनियेत राहूनही त्यांचे यश हे प्रामाणिकपणा, लोकांवरचा त्याचा विश्वास आणि सामाजिक वचनबद्धता या गोष्टींवर अवलंबून राहिले, ते शास्त्रीयदृष्ट्या उत्तम आणि यशस्वी उद्योजक आहेत म्हणून. पण, त्यांच्या सामाजिक बांधिलकीला तोड नाही.
या दोघांचाही संवाद मोकळा खुला आणि प्रामाणिक असल्याने त्यांचे कर्मचारीही तसेच वागतात. तुम्ही एक गोेष्ट सांगत असाल आणि दुसरी करत असाल, तर तुमच्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. याचाच अर्थ माणसाला आपल्या आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात काम करताना एक महत्त्वपूर्ण पाया रोवावा लागतो, जो भक्कम आहे, ज्याच्यात चिरस्थायी स्थिरता प्रदान करण्याची क्षमता आहे, मग जगात काहीही बदल घडले तरी चालेल. याशिवाय आपल्या निर्णय आणि कृतीसाठी जबाबदार असणे म्हणजे विश्वासार्हता. आपली चूक आपण स्वीकारणे आणि ती सुधारण्यासाठी विनम्रतेने प्रयत्न करणे, जेव्हा खात्री नसते, तेव्हा आपल्यावर अवलंबून असणार्या माणसांना सांगणे हे यशस्वी माणसाच्या यशाचा भाग आहे. या व्यक्ती तत्त्वनिष्ठ असतात. त्या मूल्यांवर विश्वास ठेवतात, त्या मूल्यांसाठी उभ्या ठाकतात. ज्या जगात आपण जगत असतो, त्या जगाच्या भल्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न या व्यक्तीची विश्वासार्हता कित्येक पटीने वाढवितात.
- डॉ. शुभांगी पारकर