मुंबई : तमाम भारतीयांनी दाखवलेल्या प्रेमामुळे भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांच्या अधिकृत फेसबुक पेजच्या लाईक्सची संख्या एक कोटींच्या वर गेली आहे. त्यामुळे सुनिल देवधर यांनी आभार व्यक्त करणारा एक व्हिडीओ सोशल मिडियावर मंगळवारी (दि. १९ जुलै) पोस्ट केला. "आज तुम्ही मला खऱ्या अर्थाने 'करोडपती' बनवलं. करोडपती केवळ पैशांनी न होता, मिळणाऱ्या प्रेमाने आणि लाईक्सने सुद्धा होता येतं. म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे.", असे म्हणत देवधर यांनी जनतेचे आभार मानले.
देवधर यांनी २०१२ रोजी फेसबुक अकाऊंट वापरायला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे कामाच्या व्यस्त वेळेतून ते स्वतः आपलं अकाऊंट वापरत असतात. आलेल्या कमेंट्स आणि मेसेजेसना स्वतः रिप्लाय देत असतात. त्यांनी आपलं पेज हे देशासाठी, हिंदुत्वासाठी, भाजपच्या कार्यासाठी, १३० कोटी भारतवासीयांसाठी, भारत मातेच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. त्यामुळे आज त्यांच्या फेसबुकवर असलेल्या वेरिफाईड पेजने एक कोटी लाईक्सचा आकडा पार केला आहे.
सुनिल देवधर यावेळी म्हणाले की, "आपल्याकडून मिळणारं प्रेम हे मला काम करण्यासाठी नेहमी ऊर्जा देत असतं. भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे नवीन भारत बनवण्याचे स्वप्न आपल्यासमोर ठेवलंय, ते पूर्ण करण्यासाठी आपण या माध्यमातून एकमेकांशी जोडूया आणि देशसेवेचं कार्य पुढे नेऊया."