नवी दिल्ली: कोरोना विरुद्धच्या लढाईतील सर्वात महत्वाचा टप्पा असणाऱ्या लसीकरण मोहिमेत भारताने २०० कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार केला आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरद्वारे देशाला ही आनंदाची बातमी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्दल आनंद व्यक्त करत संपूर्ण देशवासीयांची आभार मानले आहेत.
भारतातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, संशोधक, वैज्ञानिक, अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणारे सर्व कार्यकर्ते या सर्वांचे एकत्रित मिळून हे यश आहे असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. आपण सर्वांनी मिळून या कठीण काळाशी झुंज देऊन देशाचे रक्षण केलेत याबद्दल देशाला तुमचा अभिमान आहे, भारताने गाठलेल्या या २०० कोटी लसीकरणाने भारताचा कोविडविरुद्धचा लढा अजून मजबूत होईल असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.