४५ वर्षे उलटूनही नाल्याची अवस्था ‘जैसे थे’!

16 Jul 2022 14:41:54
prabhadevi nala 
 
 
 
मुंबई : ‘’सत्ताधारी मंडळी कुणीही असोत, ती स्वतःच्याच फायद्याचा विचार करतात हे निश्चित आहे. आमच्या भागातील त्या नाल्याबाबत आम्ही अनेकदा महापालिका प्रशासन, स्थानिक नगरसेवक आणि इतर जबाबदार मंडळींकडे तक्रार नोंदवली आहे. मात्र, अद्याप त्यावर कुठलीही कारवाई करण्याची तसदी प्रशासनाने अद्याप घेतलेली नाही. गेल्या अनेक वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही मुंबईतील अनेक भागांची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. मागच्या सरकारने तर काही केले नाही पण आता आम्हाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा आहेत,” अशी भावना प्रभादेवीतील स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे. प्रभादेवीतील नागरी समस्यांवर स्थानिकांनी नुकताच दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
 
 
...मग ६ कोटींची हातसफाई झाली का?
प्रभागातील या नाल्याची अवस्था ४५ वर्षांपासून ‘जैसे थे’च असून त्यात कुठलाही बदल झालेला नाही. नाल्याच्या सफाईसाठी दरवर्षी कंत्राट काढले जाते. नालेसफाई झाल्याचे दावेदेखील केले जातात. पण ते काम नक्की होते कधी, हे अजून स्थानिकांना समजलेले नाही. प्राप्त माहितीनुसार, या नालेसफाईसाठी सुमारे सहा कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. जर इतका मोठा निधी खर्च होऊनही नाल्याची दुरवस्था कायम असेल, तर मग जनतेच्या सहा कोटींची हातसफाई तर कुणी केली नाही ना, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. असे प्रभाग क्र. २०१ चे भाजप अध्यक्ष मयूर खेडेकरांनी प्रतिक्रिया दिली.
 
 
 
नवीन सरकार आमचे प्रश्न सोडवेल
नालेसफाई आणि इतर कामांवर नेमका किती खर्च झाला ते नागरिकांना समजतदेखील नाही. आमच्या भागातील नाल्यावर काही कोटींचा खर्च केल्याचे सांगितले जात असले, तरी त्याची दुरवस्थाच खर्चाबाबत स्पष्टता करत आहे. रहिवाशांना नेमक्या काय समस्या आहेत, त्यांचे प्रश्न कुठले, याचा विचार स्थानिक लोकप्रतिनिधींनी करणे आवश्यक आहे. मात्र, तसा कुठलाही विचार प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी करत नाहीत. आम्ही ४५ वर्षांपासून येथील रहिवासी असून नालेसफाईच्या बाबतीत कुठलीही सुधारणा झालेली नाही, हे आम्हाला स्पष्टपणे नमूद करावे लागत आहे. आजवर पालिका प्रशासन किंवा तत्कालीन सत्ताधारी मंडळींनी या प्रश्नाकडे सोयीस्कर डोळेझाक केली होती. मात्र, आता नव्याने सत्तेत आलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार हा प्रश्न नक्की सोडवेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे स्थानिक रहिवासी नलिनी कोठेकरांनी प्रतिक्रिया दिली.
 
Powered By Sangraha 9.0