एकपात्री नाट्यप्रयोगांचे बादशहा सदानंद जोशी यांच्या आजपासून सुरु होणार्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘स्मृतीची पाने चाळता’ या विशेष स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील सहयोग मंदिरात शनिवार, दि. १६ जुलै रोजी सायंकाळी ६.४५ वाजता हा कार्यक्रम पार पडेल. ठाण्यातील ‘व्यास क्रिएशन्स’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे हे असून आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै यांच्यासह ठाण्याचे आमदार संजय केळकर, माजी आमदार कांता नलावडे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. यावेळी प्रा. विसुभाऊ बापट यांचा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ आणि शिबानी जोशी यांनी संपादन केलेल्या ‘सदा आनंद स्मृती’ या आठवणी संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्ताने प्रा. विसुभाऊ बापट यांनी सदानंद जोशी यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
'मी अत्रे बोलतोय’ हा बहारदार एकपात्री कार्यक्रम सादर करणार्या प्रा. सदानंद जोशी सरांना गुरूस्थानी मानून दि. २६ जानेवारी, १९८१ रोजी ’कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाला मी सुरुवात केली. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी गेल्या ४० वर्षांत ३,०४९ प्रयोग सादर करू शकलो आणि महाराष्ट्रात, भारतदेशातच नव्हे, तर सातासमुद्रापलीकडे असलेल्या मराठी रसिकांनासुद्धा मी माझ्या एकपात्री कार्यक्रमात रंगवू शकलो. जोशी सर केवळ एकपात्री कलाकारच नव्हते, तर त्यांचा एकपात्री कार्यक्रमांचा प्रचंड अभ्यासही होता. याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे. १९८९ साली प्रा. रमेश चौधरी यांचा मला फोन आला. ते म्हणाले, “विसुभाऊ, महाराष्ट्र शासनाच्या कला व सांस्कृतिक संचालनालयाने कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरला तीन दिवसांचे नवोदितांसाठी नाट्य प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात ‘एकपात्री’ या विषयावर व्याख्याने द्यायला तुम्ही याल का? सर्व व्यवस्था चोख होईल, तुम्ही यावं असं मला वाटतं.” क्षणाचाही विलंब न करता मी चौधरी सरांना होकार दिला ते जोशी सरांच्या विश्वासावरच! लगेचच मी जोशी सरांच्या घरी जाऊन त्यांना चौधरी सरांच्या फोनबद्दल सविस्तर सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “काळजी करू नकोस, मी तुला एकपात्री कार्यक्रमाबद्दल माहिती सांगतोच. शिवाय मी सांगतो त्या पुस्तकांचा अभ्यास मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वाचनकक्षात बसून कर, तुझी व्याख्याने तयार होतील.” त्यानंतर जोशी सरांनी एकपात्रीबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
कायिक किंवा वाचिक अभिनयातून किमान दोन अथवा अनेक पात्रे एकाच अभिनेत्याने रंगमंचावर सादर करायची आणि अडीच-तीन तास रसिकांना खिळवून ठेवायचे, तोच एकपात्री कलाकार मानला जातो. असा एकपात्री करणे सोपे नाही. कारण, प्रचंड वाचन, पाठांतर अभ्यास, सादरीकरण, दर्जा, हजरजबाबीपणा आणि समोरच्या रसिकांना तासन्तास खिळवून ठेवायची ताकद एकपात्री कलाकारात असावी लागते. ‘मिमिक्री’ करणार्याला ‘एकपात्री कलाकार’ म्हणले जात नाही. जागतिक दृष्टीने पहिला एकपात्री कलाकार ’मार्क ट्वेन’ मानला जातो. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आपल्या विनोदी कथाकथनाचा पहिला एकपात्री कार्यक्रम त्यांनी सुरू केला आणि त्याला जगात मान्यता व प्रसिद्धी मिळाली. महाराष्ट्रातील पहिल्या एकपात्री कलाकार आहेत सुहासिनी मुळगावकर. ’संगीत सौभद्र’ आणि ’संगीत स्वयंवर’ ही नाटके त्यांना मुखोद्गत होती. पण, काही कारणाने नाटक कंपनीच्या नाटकात त्यांना संधी मिळत नव्हती. म्हणूनच सुहासिनी मुळगावकर यांनी ही नाटके एकपात्रीच्या स्वरूपात सादर करायला सुरुवात केली आणि त्यांना रसिकांनी प्रचंड दाद दिली. त्यांच्या नंतर पु. ल. देशपांडे, सदानंद जोशी, व. पु. काळे, प्रा. लक्ष्मणराव देशपांडे, मधुकर टिल्लू, संदीप पाठक इत्यादी कलावंतांना ‘एकपात्री कलाकार’ म्हणून मराठी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
जागतिक दृष्टिकोनातून मार्क ट्वेन हे पहिले एकपात्री कलाकार मानले जात असले, तरी आपला पहिला एकपात्री कलाकार आहे नारदमुनी! त्यांच्यानंतर सर्व हभप कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार असे आपलेच पहिले एकपात्री कलाकार आहेत, हेच सत्य आहे. प्रा. सदानंद जोशी सरांनी ही प्राथमिक माहिती दिल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून जमवलेल्या माहितीमुळे मी माझी व्याख्याने तयार केली आणि वारणानगरच्या नाट्य-प्रशिक्षण शिबिरात ती यशस्वी झाली. मला एकपात्री कलाकार म्हणून यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणार्या गुरूवर्य प्रा. सदानंद जोशी सरांना माझा मानाचा मुजरा!
सदानंद जोशी यांचा अल्प परिचय
सदानंद जोशी म्हणजे ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री प्रयोगाद्वारे मराठी रंगभूमीवर एकपात्री नाटकांचा ठसा उमटवणारे एक कलाकार. त्यांचा जन्म दि. १६ जुलै, १९२३ रोजी झाला असून आज दि. १६ जुलैपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांचे आणि एकपात्रीचा थोडक्यात धांडोळा घेणारे पुस्तक प्रकाशित होत आहे. सदानंद जोशी हे नाशिकचे असून वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीपासून ते संघाच्या शाखेत जात होते. त्यांचे सख्खे मामा माधव मनोहर यांच्याकडे मुंबईत आल्यानंतर त्यांनी काही काळ रुईया महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी केली. नंतर आचार्य अत्रे यांच्या सहवासात आल्यानंतर १९५४ साली राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ‘श्यामची आई’ या आचार्य अत्रे यांच्या चित्रपटांमध्ये मोठ्या श्यामची भूमिका त्यांनी केली होती. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या चित्ररथामध्ये शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका त्यांनी साकारली होती आणि त्या चित्ररथाला पुरस्कार मिळाला होता.
खुद्द पंडित नेहरू यांनी त्यांचा हा प्रयोग पाहिला होता. ‘मी अत्रे बोलतोय’ हा प्रयोग करण्यापूर्वी मार्शल मार्सो या कलावंताकडे ‘मोनो अॅक्टिंग’चे औपचारिक शिक्षण घेण्यासाठी ते फ्रान्सला १९६० साली स्कॉलरशिप घेऊन गेले होते. असा अभ्यासक्रम पूर्ण करणारे ते एकमेव मराठी कलाकार आहेत. ‘मी अत्रे बोलतोय’चे देशविदेशात जवळपास तीन हजार, ‘हास्यकल्लोळ’चे ८०० प्रयोग आणि एकपात्री ‘स्वामी’चे ६० प्रयोग त्यांनी केले. शिवाजी मंदिरला तिकीट लावून ‘हाऊसफुल्ल शो’ करणारा हा एकमेव एकपात्री नाट्य कलाकार असेल. त्यांना ‘नाट्यदर्पण’ चा १९७८ सालचा ‘मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला होता. तसेच इतर अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आकाशवाणीवरही त्यांनी ‘अत्रे’ तसेच ‘श्यामची आई’ विषयावरच्या काही मालिका केल्या होत्या.
- प्रा. विसुभाऊ बापट
(लेखक ‘कुटुंब रंगलंय काव्यात’चे सादरकर्ते आहेत.)