डॉ. श्रीकर परदेशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासकीय शिलेदार

13 Jul 2022 12:50:12

shrikar

 
 
मुंबई: कार्यक्षम आणि कर्तबगार सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून मंगळवारी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर फडणवीस-शिंदे सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून, प्रमुख सनदी अधिकार्‍यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयात तसेच, महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत कारकीर्द गाजवणारे ’बुलडोझर मॅन’ डॉ. श्रीकर परदेशी यांची ‘सिकॉम’च्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
  
श्रीकर परदेशी यांनी राज्यात विविध पदावर काम केले आहे. श्रीकर परदेशी हे २००१च्या ‘आयएएस’ बॅचचे अधिकारी असून नांदेडचे जिल्हाधिकारी असताना बोगस शाळा व शिक्षक तसेच, सामूहिक कॉपी प्रकरण उघडकीस आणले होते. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून काम करताना अवैध बांधकामे पाडल्यामुळे श्रीकर परदेशींना ’बुलडोझर मॅन’ ही उपाधी दिली गेली. केंद्रातील नियुक्तीचा कालावधी आटोपल्यानंतर २०२१ मध्ये त्यांना पुन्हा राज्यात ‘सिकॉम’च्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपण्यात आली होती. त्याच ‘बुलडोझर मॅन’ डॉ. श्रीकर परदेशी यांची आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिलेदार म्हणजेच सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0