कुठे भारत, कुठे श्रीलंका!

13 Jul 2022 10:55:44

srilanka
 
 
 
भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. निसर्गाने भरभरून दिलेल्या श्रीलंकेत नागरिकांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत. एक लीटर पेट्रोलसाठीही तिथे तब्बल साडेपाचशे रुपये मोजावे लागत असून गॅस सिलिंडर मिळणेही दुरापास्त! परिणामी, जनतेवर अक्षरशः लाकूड पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ आली. असे असताना भारतात मात्र काही ‘अजेंडाधारी’ लोकांना चांगलाच चेव आला. भारतात राहूनही देशविरोधी कारवायांमध्ये पुढाकार घेणार्‍या काही लोकांकडून आता गैरसमज पसरवण्यास सुरुवात झाली आहे. मोदींच्या नेतृत्वातील भारताला बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. भारताची अवस्था आता श्रीलंकेसारखी होणार असल्याच्या अफवा जाणूनबुजून पसरवल्या जात आहेत. मात्र, सत्य परिस्थिती वेगळीच आहे. श्रीलंका आणि भारताची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे, हे काही आकडेवारीवरून समजून येते.
 
  
श्रीलंकेवर चार लाख कोटींचे विदेशी कर्ज असून भारतावर ४९ लाख कोटी रुपयांचे विदेशी कर्ज आहे. ‘जीडीपी’च्या तुलनेत श्रीलंकेने एकूण १११ टक्के कर्ज घेतले आहे. म्हणजे, १०० रुपये कमावले, तर ११ रुपये कर्जापोटीच निघून जातात. याचाच अर्थ ११ रुपये अधिकचे मोजावे लागतात. भारताने ‘जीडीपी’च्या तुलनेत विचार केला असता ६० टक्के कर्ज घेतले आहे. म्हणजेच, भारताने १०० रुपये कमावले, तर ६० रुपये कर्जापोटी द्यावे लागतात. ‘जीडीपी’च्या तुलनेत श्रीलंकेवर ६२ टक्के विदेशी कर्ज आहे आणि भारतावर २० टक्के विदेशी कर्जाचा बोजा आहे. कर्ज घेऊन ते पैसे विकासकामे किंवा विविध प्रकल्पांसाठी वापरले जातात आणि त्यातूनही उत्पन्न मिळवता येते. केवळ भारत आणि श्रीलंकेवरच कर्जाचा बोजा आहे, असे नाही, तर अमेरिका, ब्रिटेन, रशिया अशा देशांवरही मोठमोठी कर्ज आहेत. त्या तुलनेत भारताचे कर्ज अत्यल्प म्हणावे लागेल. कर्ज किती आहे, यापेक्षा तो देश किती कमवतो, हे अधिक महत्त्वाचे आहे.
 
 
चार लाख कोटींच्या कर्जापायी श्रीलंका बुडाला, तर भारतही त्या वाटेवर असल्याच्या वावड्या अर्थहीन आहेत. आता एखादा व्यक्ती दहा रुपये कमवत असेल आणि त्याने नऊ रुपयांचे कर्ज घेतले असेल,तर तो बुडणारच. मात्र, जो व्यक्ती १०० रुपये कमवतो आणि त्याच्यावर २० रुपयांचे कर्ज आहे, तो कसा बुडेल? श्रीलंकेकडे विदेशी चलन केवळ १५ हजार कोटी रुपये असून भारताकडे तब्बल ४९ लाख कोटींचे विदेशी चलन आहे. श्रीलंकेकडे १.६ टन तर भारताकडे ७४४ टन सोन्याचा साठा आहे. श्रीलंकेचा विकासदर अवघा ३.१ टक्के असून भारताचा जगात सर्वाधिक ८.२ टक्के इतका आहे. श्रीलंकेचा महागाई दर ५४.६ टक्क्यांवर गेला असून त्या तुलनेत भारताचा महागाई दर ७.४ टक्के आहे. त्यातही मे महिन्यात तर तो सात टक्क्यांवर आला. अमेरिका, ब्रिटनमध्ये मागील ४० ते ४५ वर्षांतील महागाईचे विक्रम मोडीत निघत असताना भारताचा महागाई दर दोन अंकी संख्येपर्यंतही पोहोचला नाही. श्रीलंकेचा शेअर बाजार गेल्या पाच वर्षांत ५० टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, भारतात शेअर बाजार पाच वर्षांत ७० टक्क्यांनी वाढला आहे. श्रीलंकेत एका डॉलरची किंमत तब्बल ३६० रुपयांवर पोहोचली असून भारतात ती ७९ रुपये ४५ पैसे इतकीच आहे. त्यामुळे केवळ ‘मोदीविरोध’ हा एकमेव अजेंडा घेऊन चालणार्‍यांकडूनच आता भारताची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने सुरु आहे, अशी ओरड कानी पडते. मात्र, परिस्थिती त्याहून वेगळी आहे. केवळ एक धागा पकडून देशवासीयांची दिशाभूल करण्याचा हा तकलादू प्रयत्न किती फोल आहे, हे आकडेवारीवरून सहज लक्षात येते. कुठे श्रीलंका आणि कुठे भारत. काही तुलना आहे की नाही?
 
 
दरम्यान, श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे. त्यात भर म्हणून त्यांनी सेंद्रीय शेतीचा आग्रह धरला. चीनला भाडेतत्वावर दिलेली जमीनही त्यांना चांगलीच महागात पडली. राजपक्षे परिवाराने ‘सगळं काही आपल्याच परिवाराला’ अशी नीती राबविली. एका परिवाराकडे देशाची सत्ता गेल्यास काय होते, याचे उत्तम उदाहरण श्रीलंका आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. तसेच, भारत कुठल्याही एका क्षेत्रावर अवलंबून नाही. भारत ‘आत्मनिर्भर’ असल्याने श्रीलंका होण्याची दूरदूरपर्यंत शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे श्रीलंकेच्या अराजकतेच्या आडून भारताला बदनाम करणार्‍यांनी कितीही उर बडवला तरीही काहीही उपयोग नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0