
तिरुवनंतपुरम : केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पय्यानूर शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) कार्यकर्त्यांनी रा.स्व.संघ कार्यालय आणि भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) पदाधिकाऱ्याच्या घराला आग लावल्याने तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवार दि. १२ जुलै रोजी हा प्रकार उघडकीस आला. संघाची अनेक कार्यालये तसेच भाजप, भाजयुमो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरांवर कम्युनिस्ट पक्षाकडून हल्ले केले असल्याची माहिती एका स्वयंसेवकाने दिली आहे.
"कम्युनिस्ट पक्ष कार्यकर्ता सीव्ही धनराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कम्युनिस्ट पक्षाने मंगळवारी पायनूरमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पय्यानूर जिल्हा संघ कार्यालय, भाजपचे कार्यालय, संघाचे जिल्हा सचिव राजेश कुमार आणि भाजयुमोचे कन्नूर जिल्हा अध्यक्ष अरुण कुमार यांच्या घरांची तोडफोड करत त्याची जाळपोळ करण्यात आली.", असे संघाचे अखिल भारतीय सह-प्रचार प्रमुख आणि प्रज्ञा प्रवाहचे संयोजक जे नंदा कुमार यांचे म्हणणे आहे. संबंधित तक्रार पय्यानूरमध्ये दाखल केली आहे.
दरम्यान, पय्यानूरच्या संघ कार्यालयावर ज्यावेळी हल्ला चढवण्यात आला त्यावेळी आत कुणीही उपस्थित नव्हते त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेच्या निषेधार्थ भाजपने बुधवारी पय्यानूरमध्ये संप पुकारला आहे. कम्युनिस्ट कार्यकर्ता धनराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीवेळी दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर हा प्रकार घडल्याचा आरोप कम्युनिस्ट पक्ष कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले करण्यात आले असून संबंधित घटनेप्रकरणी काही जणांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच सध्या परिस्थिती सुद्धा नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी यावेळी म्हटले.