कसोटी विश्वासार्हतेची...

12 Jul 2022 12:23:18
trust
 
 
 
 
 
सुप्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्ता अ‍ॅरिस्टॉटल यांच्या मते, एखाद्या व्यक्तीचा प्रभाव इतरांवर पडण्यासाठी त्या व्यक्तीकडे लोकांना विश्वासार्हता आणि सचोटी असलेली व्यक्ती म्हणून पाहता यायला पाहिजे, हे तात्त्विक विधान आजही सत्य ठरते. जर तुम्हाला विश्वासार्हतेची परीक्षा उत्तीर्ण करता येत नसेल, तर तुम्ही जे काही आयुष्यात कराल, त्यात तुम्ही खर्‍या अर्थाने यशस्वी होऊ शकत नाही, हे एक अत्यंत आवश्यक कौशल्य आहे, जे तुम्हाला कोणी देऊ शकणार नाही.
 
 
एखाद्याला वैयक्तिक विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. आपण सगळेच आपल्या अवतिभोवती असणार्‍या संधीचा फायदा घेत, प्रसंगी लबाडी करून परिस्थिती हाताळत वरच्या शिड्या चढलेले अनेक लोक पाहत असतो. त्यांच्या या अप्रामाणिक यशाला पाहताना आपल्याला अचंबित वाटण्यापेक्षा खूप कीव वाटते.
 
आपण एखाद्या व्यक्तीच्या विश्वासार्हतेबद्दल विचार करतो, तेव्हा ती व्यक्ती एखाद्या विषयाबद्दल जाणकार असेल वा काही तत्त्वांवर तिचा विश्वास असेल, तर ते ज्ञान वा ती तत्त्वे ती व्यक्ती आपल्या जीवनात खरेच जगते का, हे महत्त्वाचे ठरते. शेवटी विश्वासार्हता ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याची कला आहे, बर्‍याच वेळा शास्त्रीय माहितीसुद्धा विश्वासार्ह आहे का, हा प्रश्न आपल्याला बरेच वेळा विचारला जातो, आपण विचार काय करतो अशावेळी? तर या माहितीबद्दल एक विश्वासार्ह स्रोत आहे का? माणूस म्हणून आपल्या जीवनाचा बराचसा भाग विश्वासावर अवलंबून असतो. जेव्हा केव्हा आपण अनिश्चितता अनुभवतो, तेव्हा आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, अशांनाच स्वीकारतो. कोरोना काळात इतकी प्रचंड माहिती प्रवाहात होती की, लोकांची मती गुंग होत होती. शेवटी आपण विश्वासार्ह संदेशांवरच विश्वास ठेवायचा संदेश लोकांना दिला. तथापि, विश्वास ही एक विस्तृत अशी संकल्पना आहे. आपण एखाद्या विमानचालकावर विमान चालविण्याच्या क्षमतेबद्दल विश्वास ठेवू शकतो, पण त्यांच्यावर आयुष्यातील इतर कार्यक्षेत्रात आपण विश्वास ठेवू शकत नाही. दारू प्यायलेला विमानचालक इतर अक्षम लोकांइतकाच घातक ठरू शकतो.
 
जर तुम्ही विश्वासार्ह व्यक्ती असाल, तर ती अन्य गोष्ट आहे, तुम्ही ती चालू ठेवा. तुमच्या पुढील पिढीलाही ती द्या. जगाला आणखी चांगली माणसं मिळतील. जग शांतीने आणि एकोप्याने राहील. पण, जर लोक तुम्हाला विश्वासार्ह व्यक्ती म्हणून ओळखत नसतील, तुम्हाला तुमच्या विचारांत, तुमच्या वागण्याच्या आणि गोष्टी करण्याच्या पद्धती बदलण्याची वेळ नक्कीच आली आहे. कारण, तुम्ही जे काही करता, त्यात यश मिळवण्याकरिता विश्वासार्हता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. लोक आपल्या व्यवसायात, कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यात यशस्वी होतात.
 
विश्वासार्हता ही पाहणार्‍याच्या डोळ्यात असेल, ही एक विश्वासाची अशी पातळी आहे, जी इतरांनी तुमच्याबद्दल ऐकलेल्या गोष्टींमुळे म्हणजे तुमची प्रतिष्ठा, तुमचे एकंदरीत ‘ट्रॅक रेकॉर्ड’ किंवा लोकांचे तुमच्याबद्दलचे प्रत्यक्ष अनुभव या गोष्टींमुळे तयार होत जाते, जेव्हा एखाद्याचे व्यावसायिक वा व्यक्तिगत गुण कार्यपद्धती सारेच लक्षात घेतले जाते, तेव्हा ते त्या व्यक्तीच्या वचनबद्धतेच्या क्षमतेवर विश्वासार्हतेचे मूल्य तोलले जाते. तर ही विश्वासार्हता कशी जोखली जाते? अर्थात, अनेक घटक आहेत, पण त्यापैकी काही अत्यंत मौलिक घटक पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 
सचोटी हा विश्वासार्हतेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक. सामान्यत: हे व्यक्तीच्या पारदर्शकतेचे स्वरूप आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय कसा चालविला वा तुमची कंपनी कशी चालवता वा तुमचे प्रशासन कसे चालते, तुमच्या सभोवतालच्या लोकांशी तुमचे वर्तन कसे आहे, याबद्दल विशेषकरून तुम्ही प्रामाणिक आहात का? हे पाहणे महत्त्वाचे. सद्य:परिस्थितीत आपण लोकांची दृष्टी स्वकेंद्रित झालेली पाहतो. आपले कर्तव्य आपण प्रामाणिकपणे पार पाडण्याऐवजी त्यातून आपला फायदा किती करून घेता येईल, याचा विचार केला जातो. उद्योगधंद्यात तुमचा उद्योग पुढे न्यायचा असेल, तर विश्वासार्हतेला पर्याय उरत नाही. तुमचा व्यवसाय छोट्या पातळीवर असेल वा मोठ्या कॉर्पोरेशनचा असेल, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी तुमची विश्वासार्हता महत्त्वाची आहे, नाहीतर संघर्ष अटळ आहे. तुम्ही कुठल्याही व्यवसायात असा जर विश्वासाचा पाया नसेल, तर तो व्यवसाय कोलमडलाच म्हणून समजा. अर्थात, आजच्या गतिमान जगात येन-केन-प्रकारेन यश मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड चाललेली दिसते. (क्रमश:)
Powered By Sangraha 9.0