ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना ब्राह्मणद्वेषी भाष्य भोवण्याची चिन्हे आहेत. आ. मिटकरी यांच्या बेताल वक्तव्याविरोधात परशुराम सेवा संघाच्या निवेदनानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना याप्रकरणी उचित कार्यवाही करण्याचे लेखी निर्देश बजावले आहेत. राज्यपालांच्या निर्देशानंतरही कार्यवाही झाली नाही, तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा निर्धार परशुराम सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अभिषेक समुद्र यांनी बोलून दाखवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या इस्लामपूर येथील सभेत ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यभर पडसाद उमटून मिटकरींविरोधात विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यातही ब्राह्मण संघटना व परशुराम सेवा संघाने तक्रार अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने परशुराम सेवा संघाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देऊन दाद मागितली होती.
त्यानुसार, राज्यपालांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लेखी निर्देश दिले असून, आयुक्तांनी यावर तातडीने उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात, कासारवडवली पोलिसांकडे विचारणा केली असता, हा प्रकार ठाण्यात घडला नसल्याने गुन्हा दाखल करता येत नसल्याचे वरिष्ठ निरीक्षकांनी सांगितले. तसेच, गरज भासल्यास कायदेशीर मते विचारात घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.