
बाल कवितांपासून ते प्रेम कवितांपर्यंत आणि चित्रपटगीतांपासून ते भावगीतांपर्यंत आपल्या आशयघन, तरल आणि भावमधूर कवितांनी मराठी रसिकांना मोहित करणारं नाव म्हणजे 'शांता शेळके'. 'शारद सुंदर चंदेरी राती', 'तोच चंद्रमा नभात ' 'काटा रुते कुणाला?' अशी एकापेक्षा एक गोड गाणी असोत किंवा 'पैठणी', 'दान', 'रस्ते', 'भातुकली', 'समुद्रगंध', 'कारवां', 'जन्मजान्हवी' अशा कविता शांताबाईंनी आपल्या अक्षर लेखनाने मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे.
आपल्या कवितांमधून कधी निसर्गाचे विभ्रम तर कधी मानवी मनाची आंदोलने आणि कधी नात्यांची रेशमी वीण अलवारपणे सादर करणाऱ्या शांता शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे. याचेच औचित्य साधण्यासाठी वैखरी कम्युनिकेशन्स आणि एक्सप्रेशन्स तर्फे कवी प्रवीण दवणे यांचे कवितेतल्या शांताबाई ' हे व्याख्यान आयोजित केले आहे. गेली चाळीसवर्षे आपल्या अर्थघन कवितांमधून आणि लोकप्रिय गीतांमधून मराठी काव्य रसिकांच्या पसंतीची दाद घेणारे प्रवीण दवणे, आता शांताबाईंच्याच कवितांमधून जाणवणारे, तरिही काहीसे अज्ञात राहिलेले शांताबाईंचे आयुष्य आणि त्यांच्या प्रतिभेच्या स्पदंनामधून जाणवणारं शांताबाईच व्यक्तिमत्व तितक्याच तरलपणे, संवेदनशिलतेने उलगडणार आहेत.
कवितेतील शांताबाई हे कवी प्रवीण दवणे यांचे व्याख्यान रविवार दि. १२ जून २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, १ ला मजला वा. अ. रेगे सभागृह, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे (प) येथे होणार आहे. यासंदर्भातील अधिक तपशिलांसाठी संपर्क - मकरंद जोशी - ९८६९३०४०५३