कोशातला मुख्यमंत्री...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2022   
Total Views |
 
 
 
fadnavis and thackeray
  
 
 
 
 
 
केवळ निवडणुका जवळ आल्या की, ‘हम सब एक हैं’ची नारेबाजी करणारे हे महाविकास आघाडी सरकार. मग ती निवडणूक राज्यसभेची असो अथवा विधान परिषदेची; एरवी एकमेकांची तोंडेही न बघता सरकार कसेबसे ढकलणारी ही मंडळी निवडणुकांच्या मौसमात मात्र एकीच्या बळाचे गुणगान करण्यात धन्यता मानताना दिसतात. पण, प्रश्न जेव्हा जनतेच्या प्रश्नांचा, मित्रपक्षातील आमदारांच्या समस्यांचा येतो, तेव्हा मात्र हेच मुख्यमंत्री ‘नॉट रिचेबल’ होतात आणि एकाएकी काल संभाजीनगरात दिखाव्यापुरते का होईना अवतरतात. सर्वपक्षीय आमदारांची भेट वगैरे घेणे तर दूरच. ‘कोविड’ काळात तर खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मुख्यमंत्री फोन घेत नसल्याचे सांगितल्यानंतर या सरकारमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे प्रश्न आमदारांचे असो वा सर्वसामान्यांचे, मुख्यमंत्र्यांच्या देवदुर्लभ दर्शनाचे भाग्य लाभते ते केवळ निवडणुकांपूर्वीच. आता कुठे निवडणुकीच्या तोंडावर मतांची गरज असताना अपक्ष आमदारांना, इतर छोट्या पक्षातील आमदारांशी मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला. पण, एरवी या अपक्षांना विचारतयं कोण म्हणा! त्यामुळे आपण आता केवळ पक्षप्रमुख नाही, तर या राज्याचे मुख्यमंत्रीही आहोत, याचे भान उद्धव ठाकरेंना सरकारमध्ये अडीच वर्षे उलटून गेली तरी आलेले नाहीच. उलट प्रशासकीय अनुभव नसताना तो कमाविण्याची, नवनवीन विषय समजून घेण्याऐवजी, ‘मी शहरी बाबू, मला साखर फक्त चहापुरतीच माहिती,’ अशी अर्थशून्य विधानं करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचेच उद्योग ठाकरेंनी केले. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या पदाची, जबाबदारीची जाणीव मुख्यमंत्र्यांना भविष्यात तरी होईल का, याची शक्यता तशी धुसरच! याउलट पनवेलच्या एका कार्यक्रमात नुकतेच बोलताना राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना “देवेंद्र फडणवीस हे उत्तम मुख्यमंत्री होते, यात दुमत नाही,” असे अगदी जाहीरपणे सांगत फडणवीसांनी विरोधकांच्या भेटीगाठी, त्यांची कामे निष्पक्षपातीपणे कशी पार पाडली, त्याविषयीही कौतुकाद्गार काढले. तटकरे आणि अन्य महाविकास आघाडीतील नेते अशा या कोशातल्या मुख्यमंत्री ठरलेल्या उद्धव ठाकरेंची अशी प्रामाणिक प्रशंसा करतील का?
 
देशात मिरवणारा मुख्यमंत्री...
 
 
 
लोकसभा निवडणुका जवळ आल्या की, महागठबंधनची, तिसर्‍या आघाडीची दिवास्वप्न अनेक प्रादेशिक नेत्यांना पडू लागतात. महाराष्ट्रात पवारसाहेब, नंतर उद्धव ठाकरे, बंगालमध्ये ममतादीदी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव. काही आठवड्यांपूर्वीही राव हे दिल्ली दौर्‍यावर होते. आता दिल्लीत येऊन त्यांनी ‘आप’चे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. तसेच, दिल्लीच्या शाळा, आरोग्य यंत्रणा यांचे भरघोस कौतुकही केले. असेच ‘मॉडेल’ म्हणे त्यांना तेलंगणात उभे करायचे आहे. एवढेच नाही, तर राव यांनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाची जोरदार जाहिरातबाजीही सुरू केलेली दिसते. पण, मागील काही दिवसांतील तेलंगणमधील खासकरून बलात्कार आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना बघता, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळलेली स्थितीच चिंताजनक म्हणावी लागेल. तेलंगणमध्येमागील काही दिवसांत चार ते पाच महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या. यामध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. त्यामुळे चंद्रशेखर राव यांच्या राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस यंत्रणेचे अपयशही यानिमित्ताने अधोरेखित होते. एवढेच नाही, तर अशाच एका बलात्कार प्रकरणातील ‘एमआयएम’ आमदाराच्या अल्पवयीन मुलाचा आणि पुतण्याचा सहभागही उघडकीस झाला व त्यांना या प्रकरणी वाढत्या दबावानंतर अटकही करण्यात आली. त्यामुळे तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाचे देशभरात ढोल बडवण्यापेक्षा आपल्याच राज्यातील महिलांना कशी सुरक्षितता प्रदान करता येईल, त्याचाही विचार करावा. पण, त्यापेक्षा हैदराबादमध्ये केवळ महिला आणि लहान मुलांसाठी उद्याने उघडण्याचा खटाटोप राव यांनी केलेला दिसतो. पण, आज तेलंगणच्या महिलांना, मुलींना उद्यानांपेक्षा सुरक्षिततेची हमी हवी आहे. ती हमी मुख्यमंत्री राव देतील का? मोदी सरकारच्या ध्येय-धोरणांवर फक्त टीकेचे बाण सोडण्यापेक्षा, चंद्रशेखर राव यांनी तेलंगणचा विकास, तेथील महिलांची सुरक्षा याकडे लक्ष केंद्रित केले तरी मिळवले.
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@