करमाफी आणि कर सवलतीमुळे ठाणे महापालिकेची आमदनी घटली

08 Jun 2022 17:37:58

TMP
 
 
 
 
 
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना सामान्य करामध्ये १०० टक्के सवलत देण्यात आली, तर यंदाच्या मालमत्ता कर देयकाची रक्कम एकत्रित भरणार्‍यांनाही सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत देण्यात येत आहे. यामुळे मालमत्ता कर वसुलीत घट झाली असून, पालिकेची एकूण आमदनीही घटली असल्याचे समोर आले आहे. मे २०२२ अखेरपर्यंत उत्पन्नात तब्बल ५० लाखांची तूट आल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात मालमत्ता कर महत्त्वपूर्ण असून त्याद्वारेच महसुली जमाखर्चाचा डोलारा संभाळला जातो. २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये महापालिकेने ७०० कोटींपेक्षा अधिकचे लक्ष ठेवण्यात आले. मात्र, ठाणे महापालिकेच्यावतीने मागीलवर्षी ६१३ कोटी रुपयांची करवसुली झाली आहे. परंतु, एप्रिल महिन्यात जेमतेम ३.०९ कोटींची करवसुली झाली होती, तर त्यानंतर मे महिन्यात ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करामधील सामान्य करात करमाफी देण्यात आली.
 
 
 
त्यामुळे नागरिकांचे मालमत्ता करातील बिलांची रक्कम ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत कमी झाली, तर दुसरीकडे यंदाच्या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसर्‍या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी १५ जूनपर्यंत जमा केल्यास करदात्यांना त्यांच्या दुसर्‍या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे, तर त्यापुढील दिलेल्या मुदतीत कर भरणार्‍यांनाही दोन ते चार टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आजघडीला उत्पन्नात तब्बल ५० लाखांची तूट आली असल्याने पालिका प्रशासनाला मालमत्ता कराच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागत आहेत. उपआयुक्त जी. जी. गोदापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली करसंकलनासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. मालमत्ता करमाफीमुळे महापालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु,नव्या मालमत्तांचा शोध घेऊन करण्यात आलेल्या वसुली मोहिमेमुळे मे २०२२ अखेर उत्पन्नामध्ये ८७.५२ कोटींची वसुली शक्य झाल्याचे महापालिकेतील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
 
 
 
वाढत्या नागरीकरणाचा करवसुलीला हात
 
गेल्या काही वर्षांत मुंबईच्या सीमेवर वसलेल्या तलावांचे शहर ’ठाणे’ नगरीमध्ये नागरीकरण वाढले आहे. यामुळे मालमत्ता करवसुलीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मे अखेरपर्यंत घोडबंदर रोड परिसरातील माजिवडा-मानपाडा प्रभाग आणि वर्तकनगर प्रभागातून बक्कळ कर वसुली झाली आहे. मे अखेरपर्यंत वर्तकनगर प्रभागातून २३.८८ कोटींची वसुली झाली आहे. माजिवडा-मानपाडा १८.५९ कोटी, नौपाडा कोपरी १४.१८, उथळसर ७.२४, दिवा ३.८७, सावरकरनगर २.५८, कळवा २.४८, वागळे इस्टेट २.१७ आणि मुंब्रामध्ये १.७७ कोटींची वसुली झाली आहे, तर मुख्यालयामध्ये १०.७५ कोटी मालमत्ता कराची वसुली झाली आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0