
बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच केके यांचे ३१ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कॉन्सर्ट दरम्यान त्याला अचानक त्रास सुरु झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. केकेसारख्या गायकाचे अकस्मात निधन होणे हे सर्वांसाठीच धक्कादायक होते.
केकेने कित्येक सुपरहिट गाणी बॉलीवूडला दिली आहेत. त्याने गायलेले त्याचे शेवटचे गाणे 'धूप पानी बहने दे' त्याच्या मृत्यू पश्चात रिलीज झाले आहे. 'शेरदिल' या बॉलिवूड चित्रपटासाठी केकेने गाणे म्हटले होते. ‘धूप पानी बहने दे’ असे या गाण्याचे बोल आहेत. अभिनेता पंकज त्रिपाठी हे शेरदिल चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यावरच हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘धूप पानी बहने दे’ गाणे गुलजार यांनी लिहिले आहे. तर शांतनु मोइत्रा यांनी ते कंपोझ केले आहे.
केकेचे सोशल मिडीयावरील शेवटचे गाणे 'धूप पानी बहने दे' चा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्याचे शेवटचे गाणे ऐकून त्याच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांनी ह्या व्हिडिओवर इमोशनल कमेंट्स देखील केल्या आहेत.