सात बेटांचे शहर म्हणून कधीकाळी ओळखल्या जाणर्या मुंबईच्या किनारपट्टीवर अनेक जीवसमूह आढळून येतात. या विविध परिसंस्थांमध्ये अनेक समुद्री जीव आपले जीवन जगतात. तेही अगदी मुंबईकर असल्यासारखेच. ही बहुरंगी सृष्टी उलगडून दाखवणारा हा लेख...
मुंबई हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या किनारपट्टीवरील महानगरांपैकी एक आहे. उच्च लोकसंख्येची घनता असतानाही, मुंबईची किनारपट्टी परिसंस्था विविध जीवांचे घर आहे. तथापि, मानववंशीय क्रियाकलापांमुळे ही विविधता अत्यंत धोक्यात आहे. मुंबईच्या किनारपट्टीचे वालुकामय किनारे आणि हाजी अलीच्या किंवा बँड-स्टँडच्या खडकाळ किनार्याची विविधता समजून घेणे हे सध्याच्या अभ्यासांचे उद्दिष्ट आहे. भारत जैवविविधतेसाठी जगविख्यात आहे. अगदी सह्याद्रीच्या सर्वश्रुत कड्यांपासून ते ‘सुंदरबन’च्या जंगलापर्यंत भारत हा जैवविविधतेची खाण आहे. पण इतकंच नाही, जलचर किंवा सागरी जीवनाच्या बाबतीतही, भारताकडे देण्यासारखे बरेच काही आहे. द्वीपकल्पीय प्रदेश असल्याने भारत तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. भारताला 7516.6 किमी (नऊ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेला) समुद्रकिनारा आहे. त्यापैकी महाराष्ट्राला 720 किमींचा समुद्रकिनारा आहे. यामध्ये, एकट्या मुंबई शहराला 149 किमी समुद्रकिनारा लाभला आहे.
मुंबईची सागरी परिसंस्था खूप नाजूक आहे. त्यात विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यातील काही जीव, तर फक्त ओहोटीच्या काळात दिसतात. किनार्याच्या संरचना विविध निवासस्थाने या वेगवेगळ्या रहिवाशांना देतात. काही किनारे वालुकामय, तर काही खडकाळ असतात. काही ठिकाणी या दोन्ही गोष्टी आढळतात. जिथे या दोन्ही संरचना दिसतात, त्या किनार्यांवर जैवविविधता अधिक दिसते. या अनोख्या ‘इकोसिस्टीम’च्या प्रजातींच्या विविधतेबद्दलचे ज्ञान, जैवविविधता जतन करण्याबरोबरच शाश्वत पद्धतीने, संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्यास मदत करेल, असे 2021 साली पर्यावरण बुलेटिन, फार्माकोलॉजी आणि जीवन विज्ञान या पुस्तकात प्रसिद्ध लेखात पवार म्हणतात. मुंबईला अजून एक महत्त्वाचा प्रदेश लाभला आहे, तो म्हणजे, अंतर्भरतीचा प्रदेश. हा प्रदेश हा समुद्र, जमीन आणि हवा यांच्यातील परस्परसंवादाचे क्षेत्र आहे, तो सागरी बायोटाच्या सर्वात मनोरंजक प्रदेशांपैकी एक आहे. अंतर्भरती (ळपींशी-ींळवरश्र) प्रदेश म्हणजे, जो प्रदेश संपूर्ण ओहोटीच्या काळात दिसतो, तो समुद्राचा भाग होय.
सागरी परिसंस्था ही जगातील सर्वात वैविध्यपूर्ण परिसंस्था आहे आणि तिची प्रक्रिया आणि कार्य समजून घेण्यासाठी विशेष लक्ष आणि माहितीची आवश्यकता आहे. कारण, ही संस्था विविध आणि अद्वितीय वनस्पती आणि प्राणी समुदायांना आश्रय देते. या ‘इंटरटायडल झोन’मध्ये काही अतिशय भव्य जीवने दिसतात. अनेक वर्षांपासून मुंबई आणि आसपासच्या अंतर्भरतीच्या क्षेत्रात संशोधन सुरू आहे. संपूर्ण भारतामध्ये केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, ढोबळमानाने, सागरी विविधता ही मुख्यत्वे मॉलस्कची बनलेली आहे. मॅक्रो बेंथिक (एक मिलीमीटरपेक्षा लहान जीव) जीवजंतूंपैकी मुंबई आणि आजूबाजूच्या किनार्यावर ‘गॅस्ट्रोपॉड्स’ आणि ‘बायव्हाल्व्ह’ वर्चस्व दर्शवितात. खारफुटीच्या भागातही ‘गॅस्ट्रोपॉड्स’चे प्राबल्य होते, त्यानंतर ‘बायव्हल्व्ह’ आणि नंतर ‘पॉलीप्लाकोफोरा’ देखील मुंबईत नोंदवले गेले होते
उरणच्या किनार्यावरून ब्रॅच्युरान खेकड्यांची नोंद झालेली आहे. मुंबईच्या सभोवतालची अंतर्भरतीची परिसंस्था पर्यावरणदृष्ट्या स्वच्छ आणि जीवजंतूंच्या रचनेने समृद्ध होती. परंतु, शहरातून सतत वाढत असलेल्या मानववंशजन्य स्रावांमुळे ते विस्कळीत आणि असंतुलित झाले आहे. मुंबईचा समुद्र म्हणजे केवळ प्लास्टिक आणि प्रदूषण नाही. नशिबाने, तेथे एक संपूर्ण नवीन जग आहे. अलीकडेच, म्हणजे 2020 ला, ‘कॅलिफोर्निया अकॅडमी ऑफ सायन्स’ आणि नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’ने मुंबईच्या समुद्रकिनार्यावर आढळणार्या वनस्पती आणि प्राण्यांच्या 341 प्रजातींची यादी केली, ज्यांचे मुंबईच्या ‘मरिनलाईफ’ या संस्थेने अडीच वर्षांच्या कालावधीत दस्तावेजीकरण केले. समूहाने दस्तावेजीकरण केलेल्या 2020 सालच्या निरीक्षणांमधून, समुदायातील तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी संपूर्ण 341 प्रजातींची ओळख शोधली आहे.
इतक्या अतुल्य जैवविविधता असलेल्या किनार्याचे नजीकच्या काळातील अभ्यास मात्र, मानवनिर्मित घडामोडी आणि प्रदूषणाने होणारे पर्यावरणाचे नुकसान धडधडीतपणे दाखवतात. अगदी जैवविविधतेच्या मात्रेत झालेली घसरण, ठोस पुरावा आहे, या नुकसानाला. मानवी क्रियाकलाप, स्थानिक रहिवाशांकडून जीवांची अनियंत्रित कत्तल इ. बाबी, त्यांच्या लोकसंख्येच्या घनतेवर परिणाम करतात आणि जास्त आकडा कमी होऊन पर्यावरणीय असंतुलन होऊ शकते. 2021 च्या गिरगाव चौपाटी आणि हाजी आली क्षेत्राच्या अभ्यासात, निर्देशांकांची तुलना केल्यास हाजी अलीकडे गिरगाव चौपाटीपेक्षा अधिक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध प्राणी असल्याचे दिसून आले. जमिनीतला फरक कदाचित वेगवेगळ्या जीवांच्या प्रसारास योगदान देत असेल. परंतु, दोन्ही ठिकाणी ‘गॅस्ट्रोपॉड्स’ प्रबळ होते, ‘मार्गालेटची समृद्धता निर्देशांक’ (चरीसरश्रशीं’ी ीळलहपशीी ळपवशु) गिरगाव आणि हाजी अली येथे अनुक्रमे 2.22 आणि 3.97 होता. परंतु, हे आकडे मुंबईच्या जवळपासच्या किनार्यांच्या अभ्यासापेक्षा बरेच कमी आहेत. अर्थात, मानवी हस्तक्षेप इथे दिसतो. गेल्या दशकातील अनेक नोंदी बघता, वैविधतेचे नुकसान होत आहे, हे स्पष्ट दर्शवले जात आहे. अभ्यासक या नुकसानाचे श्रेय दोन्ही साईट्समधील किनार्याभोवतीच्या बांधकाम क्रियाकलापांना देतात.
‘इंटरटायडल झोन’मधील जीवांच्या जीवनावर प्रभाव टाकणारा सर्वात महत्त्वाचा भौतिक घटक म्हणजे लहरींचे अस्तित्व आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी. प्रचंड मानवनिर्मित पर्यावरणीय समस्यांमुळे पाण्याची गुणवत्ता बिघडते आणि वनस्पती आणि प्राणी कमी होताना दिसते आहे. वाढत्या मानववंशीय दाबाचा परिणाम या किनार्यांवर दिसून येतो आहे.
हाजी अलीमध्ये, प्रदूषण, पर्यटक व स्थानिक घडामोडी, पर्यटन कचरा आणि अलीकडील किनारपट्टी रस्ता प्रकल्प जैवविविधतेला हानी पोहचवित आहे. गिरगाव चौपाटीमध्ये, प्रदूषणामुळे, गाळ आणि सेंद्रिय पदार्थ साचल्यामुळे ऑक्सिजनचा र्हास होतो आहे. ज्यामुळे सल्फेटचा काळा थर तयार होतो. हा थर त्या परिसरावर रासायनिक प्रक्रियेद्वारे हायड्रोजन सल्फाईटचा काळा थर निर्माण करतो जो किनार्यावर आणि ‘गॅस्ट्रोपॉड्स शेल्स’वर पॅच म्हणून दिसतो. हाच हायड्रोजन सल्फाईड गॅस, समुद्र किनारी घाण वास यायला कारण आहे. गिरगावच्या वालुकामय भूभागात मोठ्या प्रमाणात ‘हर्मिट’ खेकडे, सागरी ‘गॅस्ट्रोपॉड्स’ होते. हाजी अलीमधील भरती-ओहोटीच्या तलावांमध्ये, ‘कोरल’ आणि ’पॉलीप्स’ वाढताना नोंदी आहेत. तसेच इथे समुद्रातील ‘स्लग’, ’मडस्कीप’ आणि इतर मासेदेखील पाहिले गेले आहेत. पण या सगळ्याच गोष्टी आता जवळजवळ नाहीशा झालेल्या आहेत. रासायनिक प्रदूषण आणि त्याहून घटक असे प्लास्टिक पिशव्या, वापर, प्लास्टिक आणि सिनथेटीक कव्हर्स, थर्माकोलइ. वस्तूंनी आपली किनारपट्टी भयंकर दूषित आणि प्रदूषित केलेली आहे. मुद्दा विकासाचा नसून, शाश्वत विकासाचा आहे. कोस्टल रोडचा प्रकल्प कितीही मुंबईसाठी महत्त्वाचा असला तरीही, तो विकास शाश्वत विकास होऊ शकेल का? या वर भर देण्याची गरज आहे असे मला वाटते. ‘शाश्वत’ अर्थात, नुकसान होत आहे, हे कबूल करून, त्या बदल्यात, संवर्धनासाठी दुपटीने पावले टाकली गेली पाहिजेत असा अर्थ होतो. नाहीतर, परत एकदा, देवाने मुंबईला दिलेला अजून एक अपूर्व ठेवा, आपण हरवून बसू.
-डॉ. मयुरेश जोशी