अमेरिकेकडे पर्याय नाही...

04 Jun 2022 12:04:05
 
 
johny
 
 
 
अमेरिकेमध्ये हॉलीवूड अभिनेता जॉनी डेप याला त्याच्या पूर्व पत्नीने म्हणजे हॉलीवूड अभिनेत्री एंबर हर्डने १५ दशलक्ष डॉलर्सची भरपाई करावी, असे आदेश तिथल्या न्यायालयाने दिले आहेत. ही घटना सांगण्याचे कारण की, घरगुती हिंसाचार आशियाई देशातच होतो का? किंवा आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबामध्येच घरगुती हिंसा होते का? असा प्रश्न पडलेले लोक आहेत. तर या सगळ्याच्या प्रश्नाला उत्तर होऊ शकेल, अशी घटना आहे. जॉनी डेप आणि एंबर हर्ड हे हॉलीवूडचे लोकप्रिय कलाकार, समाजात त्यांना मान्यता. या दोघांचा विवाह २०१५ साली झाला. मात्र, दोनच वर्षात ते विभक्त झाले. अर्थात, आधुनिक त्यातही पाश्चिमात्य जगतात विभक्त होणे म्हणजे काही नाविन्यपूर्ण घटना नाही. बहुतेकवेळा पाश्चात्य जगातला घटस्फोट हा भौतिक सुखाच्या अधिक अधिक उच्च पायरी गाठण्यासाठी घेतला जातो, असे चित्र समाजामध्ये आहे. हॉलीवूड कलाकार जॉनी आणि एंबरनेही अशाच काही कारणासाठी घटस्फोट घेतला असेल, असेही त्यावेळी बहुतेकांना वाटले. पुढे २०१८ साली एंबरने ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये एका मुलाखतीमध्ये विधान केले की, तिचे जीवन म्हणजे घरगुतीहिंसाचाराचे सार्वत्रिक उदारहण आहे. यामध्ये एंबरने कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र, एंबरच्या या विधानाने आपल्या प्रतिमेला धक्का बसला, असे म्हणत जॉनीने एंबरवर मानहानीचा दावा ठोकला.
 
 
जॉनीचे म्हणणे होते की, एंबरच्या विधानामुळे त्याची प्रतिमा डागाळली. लोक त्याला पत्नीवर अत्याचार करणारा हिंस्र पशू म्हणून पाहू लागले. त्याच्याकडून अनेक प्रोजेक्ट परत घेतले गेले. त्याचे कधीही भरून न येणारे मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक नुकसान झाले. जॉनीच्या या मानहानीच्या दाव्याला त्याच्या चाहत्याकडून समर्थन मिळाले. या चाहत्यांनी ‘सेव्हजॉनी’ म्हणून ‘हॅशटॅग’ तयार केला.
 
 
अमेरिकेतील पुरूषांनी अर्थात विवाहित पुरूषांनी या ‘हॅशटॅग’ला चांगलेच डोक्यावर घेतले. त्यांचे म्हणणे होते की, पत्नीला स्त्री म्हणून समाजात विशेष वागणूक दिली जाते. त्यामुळे पत्नीची चूक असली तरीसुद्धा त्याची किंमत पतीलाच चुकवावी लागते. पती पुरूष आहे म्हणून तो सदासर्वकाळ चूकच किंवा वाईटच कसा असेल? तर यावर एंबरने जाहीर केले की, तिने जॉनीला घटस्फोट का दिला? तिचे म्हणणे, “दारु प्यायल्यावर जॉनी राक्षस व्हायचा. तिच्यावर अत्याचार करायचा. त्याची नशा सुटावी म्हणून तिने खूप प्रयत्न केले. सामाजिक इज्जतीसाठी ती कुठेही या घटनांचा उल्लेखही करू शकत नव्हती.” त्या हिंसाचाराच्या बदल्यात जॉनीने १०० दशलक्ष डॉलर्सची भरपाई करावी, असा दावाही तिने न्यायायलात केला. जॉनी आणि एंबर या दोघांनी एकमेकांवर न्यायालयात दावा ठोकल्याने अमेरिकेच्या समाजजीवनात यावर भरपूर चर्चा झाल्या. न्यायालयात सात ज्युरी यासाठी नियुक्त केले. या ज्युरींनी जॉनी आणि एंबरचे सविस्तर म्हणणे ऐकले. त्यांच्याशी संबंधित सर्वच परिचित, नातेवाईक, मित्र, सहकारी यांच्याशी चर्चा केली. त्यातले मुद्दे, पुरावे म्हणून ग्राह्य धरले. त्यातून या सात ज्युरींनी निष्कर्ष काढला की, एंबर यांच्या विधानामुळे जॉनी डेप यांची प्रतीमा मलिन झाली. त्यांची मानहानीझाली. त्यामुळे एंबर हर्ड यांनी १५ दशलक्ष डॉलर जॉन डेप यांना द्यावेत.
 
 
न्यायालयाने निर्णय सुनावल्यावर जॉनी डेप म्हणाला की, “त्याला पुनर्जन्म मिळाला आहे,” तर एंबर हर्डचे म्हणणे की, ”तिच्याकडचे पुरावे तिच्या पूर्व पतीच्या आर्थिक आणि सामाजिक प्रभावापुढे टिकू शकले नाहीत. समाजाने घरगुती हिंसाचाराकडे गंभीरतेने पाहावे, या विचारावर याचा परिणाम होणार आहे.”
 
 
यावर अमेरिकेतील समाज अभ्यासकांचे म्हणणे आहे की, जॉनी आणि एंबरच्या वैयक्तिक जीवनातली ही घटना अमेरिकेत खूपच सार्वत्रिक आहे. एका अहवालानुसार,संपन्न अमेरिकेत ३६ टक्के महिलांना घरगुतीहिंसेला सामारे जावे लागते. तसेच, २७ टक्के पुरूषांनाही घरगुती हिंसाचार सहन करावा लागतो. थोडक्यात, घरगुती हिंसाचाराच्या बळींमध्ये स्त्री-पुरूष भेद नाही. तसेच, अमेरिकेमध्ये एका मिनिटाला तीनपैकी एका स्त्रीवर बलात्कार होतो, तर एका मिनिटात चारपैकी एका पुरूषावरही बलात्कार होतो.भयंकर. या सगळ्यामुळे अमेरिकेचे सामाजिक जीवन अत्यंत विस्कळीत झाले आहे. समाजजीवन, कुटुंबव्यवस्था टिकावी, नात्यांमध्ये प्रेम आणि माणुसकी कायम राहावी, यासाठी अमेरिकेत नव्याने सामाजिक प्रयोग करावेच लागणार, असे या अभ्यासकांचे म्हणणे.
 
 
Powered By Sangraha 9.0