पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला!

30 Jun 2022 09:56:28

raju shetty
 
 
मुंबई : फ्लोअर टेस्टसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी रात्री फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्याचबरोबर विधानपरिषद सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला. दरम्यान यासंबंधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनो, स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीच्या आड्यांचा तुम्ही एक-एक बांबू उपसला; पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला!", असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
 
"महाविकास आघाडीच्या नेत्यांनो, स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीच्या आड्यांचा तुम्ही एक-एक बांबू उपसला; पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला! देवाच्या काठीला आवाज नसतो!!'" असे म्हणत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी नेत्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी जनतेशी भावनिक संवाद साधत लोकशाहीचा डोकी मोजायचा खेळ मला खेळायचा नाही, असे म्हटले होते. तसेच शिवसेना प्रमुखाच्या मुलाला शिवसैनिकांनीच मुख्यमंत्री पदावरुन उतरवलं. मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत नाही, असे म्हणत मी आज मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचाही त्याग करत आहे, अशी घोषणा त्यांनी केली.
 
दरम्यान शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी चाळीसहूनही अधिक आमदार प्रथम सुरत आणि नंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे अल्पमतात आले होते. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ३० जून रोजी फ्लोर टेस्ट घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र राज्यपालांच्या निर्देशाविरोधात मविआ सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु ३० जून रोजीच फ्लोअर टेस्ट घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालय ठाम राहिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
 
Powered By Sangraha 9.0