चुकीचे वीजबिलाचे रिडींग देणाऱ्या एजन्सीवर संजय ताकसांडे यांची कार्यवाही

30 Jun 2022 16:29:55
mahaviran
 
मुंबई : अनेकदा महावितरणकडून ग्राहकांना चुकीचे बिल जात असल्याची तक्रार येत असते. काहीवेळेस वीजमीटरचे रीडिंग चुकीचे केले जात असलयाचे ग्राहकांच्या तक्रारी येत असतात. यावर आता महावितरणकडून मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. असा इशारा महावितरणचे संचालक, संजय ताकसांडे यांनी बुधवारी मीटर रिडींग एजन्सीचे संचालक व प्रतिनिधींच्या बैठकीत दिला. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व बिल दुरुस्तीच्या त्रासासोबतच महावितरणच्या महसूलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. असे संजय ताकसांडे यांनी बैठकीत सांगितले.
 
 
मीटर रिडींग एजन्सीचे संचालक व प्रतिनिधी यांच्या बैठकीत मागील दोन महिन्यांपासून अचूक रिडिंगच्या बाबतीत सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही नादुरुस्तीचा शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचं वीजमीटरचे रीडिंग घेणे यासारख्या कारणांमुळे सोलापूर जिल्ह्यातील तीन व पुणे जिल्ह्यातील दोन अशा पाच मीटर रीडिंग एजन्सीना या बैठकीतच संजय ताकसांडे यांनी तडकाफडकी बडतर्फ केले. तसेच महावितरणच्या संबंधित तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
 
 
संजय ताकसांडे यांनी घेतलेल्या बैठकीत, "मीटर रीडिंग हा बिलींगचा मुख्य आधार आहे. त्यात १०० टक्के अचूकता पाहिजेच. परंतु चुकीचे रीडिंग घेतल्यास महावितरणच्या महसूलाचे नुकसान आणि ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास होतो ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मीटर रीडिंग एजन्सीजविरुद्ध केवळ कारवाई करणे हा मुख्य उद्देश नाही. परंतु रीडिंगसाठी जे अचूकतेचे, गुणवत्तेचे मापदंड आहेत त्यात कुचराई झाल्यास एजन्सीज व महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. अचूक मीटर रीडिंगबाबत उपविभाग व विभाग कार्यालयांनी दैनंदिन आढावा घ्यावा. बिलिंग किंवा रीडिंगमध्ये कोणतीही अनियमितता आढळल्यास ताबडतोब उपाय करावेत व ग्राहकांना अचूक बिल मिळेल याची काळजी घ्यावी. सोबतच मीटर रीडर नियुक्त करताना त्यांची शैक्षणिक पात्रता, तांत्रिक प्रशिक्षण, संवाद कौशल्य, गुणवत्ता इत्यादी बाबी संबंधित अधिकाऱ्यांनी एजन्सीजकडून तपासून घ्यावे." असे निर्देश यावेळी देण्यात आले.
 
 
"विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढतो. त्यामुळे अचूक बिलींगसाठी १०० टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य असून यासाठी सुरु असलेल्या उपायांमुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये बिलिंग व रीडिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. मीटर रीडिंग हे अचूक व गुणवत्तेनुसार होईल यासाठी कायम काळजी घेण्यात येईल. असे संजय ताकसांडे यांनी सांगितले असून वारंवार सूचना देऊनही एजन्सीजने रीडिंगमधील हेतुपुरस्सर चुका किंवा सततचे दोष टाळले नाहीत तर एजन्सीना बडतर्फी किंवा काळ्या यादीत टाकले जाईल. प्रसंगी फौजदारी कारवाई केली जाईल." असे संजय ताकसांडे यांनी घेतलेल्या बैठकीत सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0