पालिकेच्या विरोधात शिवसैनिकच रस्त्यावर!

03 Jun 2022 10:59:05
 
shivsena
 
मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी सत्ताधारी असणार्‍या शिवसेनेच्या शिवसैनिकांनाच पालिकेच्या भोंगळ कारभाराला कंटाळून शेवटी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. मुंबईतील प्रभाग क्र. ११७ मधील परिसरातील पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्याबद्दल सातत्याने तक्रार करूनही पालिकेने कुठल्याही पद्धतीने प्रतिसाद दिला नसल्याने गुरुवारपासून नागरिकांनी रस्त्यावर उतरून पाईपलाईन शेजारीच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
 
 
विशेष म्हणजे, हे आंदोलन शिवसैनिकांनीच रस्त्यावर उतरुन पालिकेविरुद्ध केले आहे. “अनेकदा पालिकेकडे तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही आणि म्हणूनच आज आम्ही हे आंदोलन करण्यास रस्त्यावर उतरलो आहोत,” असे या शिवसैनिकांनी सांगितले. तसेच पाईपलाईनची दुरुस्ती करा, लाखो लीटर पाणी वाचवा, अशा आशयाचे फलक घेऊन हे शिवसैनिक रस्त्याच्या मधोमध बसून पालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवत होते. तसेच “आज पालिकेचे कर्मचारी या पाईपलाईनचे काम करण्यास येणार होते. यासंदर्भात मी आजच संदेश पाठवला होता. त्यामुळे स्थानिकांना आंदोलन करण्याची गरज नव्हती,” असे मत शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.
 
 
Powered By Sangraha 9.0