राजस्थान: इस्लामी जिहाद्यांनी कापला कन्हैयालालचा गळा

29 Jun 2022 12:31:56

udaypur
 
 
उदयपूर: राजस्थानच्या उदयपूरमध्ये भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबरांविषयीच्या विधानाच्या समर्थनात दहा दिवसांआधी समाज माध्यमांवर ‘पोस्ट’ करणार्‍या एका शिवणकाम करणार्‍या व्यक्तीची रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मदनामक इस्लामी जिहाद्यांनी गळा कापून निर्घृण हत्या केली. उदयपूरच्या धानमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला असून कन्हैयालाल तेली असे मृताचे नाव आहे. ते या भागात ‘सुप्रीम टेलर्स‘ नावाने शिवणकामाचे दुकान चालवत होते. धक्कादायक म्हणजे, कन्हैयालाल तेली यांच्या हल्लेखोरांनी हत्या करतानाच्या संपूर्ण घटनाक्रमाची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ केली आहे. त्यात दोन्ही हल्लेखोर कन्हैयालाल यांच्या दुकानात कपडे शिवण्याच्या बहाण्याने आल्याचे व नंतर गळा कापत असल्याचे दिसते. दरम्यान, दुपारी अडीच वाजता रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद या दोन्ही हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. तर हिंदुत्ववादी संघटनांनी कन्हैयालाल यांच्या हत्येविरोधात जोरदार विरोधप्रदर्शन केले आहे.
 
 
गेल्या काही दिवसांपासून कन्हैयालाल यांनी इस्लामी कट्टरपंथीयांकडून सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या. त्याची पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली होती. मंगळवार, दि. २८ जून रोजी रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद या दोघांनी कन्हैयालाल यांच्या दुकानात घुसून त्यांच्यावर अनेक वार केले व गळा कापला. ध्वनिचित्रफितीत दोन्ही इस्लामी जिहादी सुरुवातीला कन्हैयालाल यांना कपडे शिवण्यासाठी माप घ्यायला सांगत असल्याचे व नंतर धारधार शस्त्राने हल्ला करत असल्याचे दिसते. त्यानंतर ध्वनिचित्रफितीत कन्हैयालाल यांचे रक्ताने माखलेले शव जमिनीवर पडलेले दिसते.
दरम्यान, कन्हैयालाल यांचा हत्या केल्यानंतर रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद दोघेही फरार झाले व नंतर एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांतून समोर आली. त्यात दोन्ही हल्लेखोर धारधार शस्त्र हाती घेऊन आपला गुन्हा कबुल करताना दिसतात. ‘नबी की शान के खिलाफ बोलनेवाले का सर कलम होगा’ याबरोबरच ध्वनिचित्रफितीत पुढे रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद, पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देऊन त्यांचाही गळा कापण्याची व नुपूर शर्मांचीही अशीच हालत करण्याची धमकी देत असल्याचे ऐकायला मिळते.
 
 
दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी याप्रकरणी ट्विट करत सर्व गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे म्हणाले आहेत.
 
 
आम्ही लढू आणि जिंकू ः विहिंप
 
 
कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच, “भारताच्या उदारवादी, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षतेला आव्हान देणारी ही घटना असून आम्ही हे आव्हान स्वीकारत, त्याच्याशी लढण्याची व विजय मिळवण्याची खात्री देतो,” असे ते म्हणाले. सोबतच, “नुपूर शर्मा आणि नवीन जिंदालदेखील जिहाद्यांच्या निशाण्यावर आहेत, सरकारने त्यांना व त्यांच्या कुटुंबालाही पुरेशी सुरक्षा पुरवावी,” असे ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0